

Congress Nashik camp : काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी राहुल गांधींनी कंबर कसली आहे. देशपातळीवर संघटना वाढीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने नियुक्त केलेल्या 72 जिल्हाध्यक्षांचे शिबिर नाशिकमध्ये होणार आहे. दहा दिवस हे शिबीर चालणार आहे. या शिबिरास 2 सप्टेंबर रोजी पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी उपस्थित राहणार असून जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करणार आहे.
मात्र, राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनापूर्वी शिबिरात सहभागी 72 जिल्हाध्यक्षांना एक दिवस नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये मुक्काम करावा लागणार आहे. 72 जिल्हाध्यक्ष वेगवेगळ्या 72 गावांमध्ये जातील. त्यांना तेथेच भोजन आणि निवास करावा लागणार आहे. लोकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न व समस्या जाणून घ्याव्या लागणार आहेत. दिलेल्या टास्कची अनुभूती नंतर शिबिरात मांडावी लागणार असल्याची माहिती नाशिक शहराध्यक्ष निलेश (बबलू) खैरे यांनी दिली.
काँग्रेस पक्षाच्या संघटनवाढीची संकल्पना बदलली असून काँग्रेसच्या संघटन सृजन अभियान अंतर्गत जिल्हाध्यक्षांच्या निवड आणि नियुक्ती प्रक्रियेचा एक भाग म्हणून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. संघटना कशी वाढवावी, संवाद कसा सादावा अशा अनेक मुद्यांवर या 72 जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पक्षाची आगामी राजकीय दिशा, संघटनात्मक आव्हाने आणि पक्षाची विचारधारा यावर शिबिरात चर्चा होणार आहे.
शिबिराचे स्थळ निश्चित करण्यात आले आहे. नाशिक शहरातील गंगापूर धरणाजवळील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टमध्ये 10 दिवस हे शिबिर चालणार आहे. या निवासी शिबिरात पक्षातील सहभागी जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना शिबीर स्थळ सोडून कोठेही जाण्याची परवानगी नसेल.
अनेकदा राजकीय पक्षांच्या शिबिरावेळी किंवा त्या दरम्यान पक्षातील पदाधिकारी त्र्यंबकेश्वर किंवा शिर्डी येथे देवदर्शनासाठी जातात. मात्र, या शिबिराच्या दहा दिवसांच्या कालावधीत पदाधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. या काळात सर्व पदाधिकाऱ्यांचा मुक्काम रिसॉर्टमध्येच असणार आहे. शिबिराचे स्वरूप पूर्णतः बंदिस्त ठेवण्यात आले आहे. मार्गदर्शनासाठी येणारे वक्ते किंवा मार्गदर्शक केवळ त्यांच्या नियोजित सत्राच्या वेळेत शिबिरस्थळी उपस्थित राहतील. मार्गदर्शनाचे सत्र संपल्यानंतर ते तेथून निघून जातील.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी 2 सप्टेंबर रोजी नाशिकला येणार असून, ते शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. मात्र, राहुल गांधी यांच्या आगमनापूर्वीच 72 शिबिरार्थींना नाशिक जिल्ह्यातील एका गावात मुक्काम करण्याचा टास्क देण्यात आला आहे.
शिबिरार्थींना संबंधित गावातच भोजन आणि मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधावा लागणार आहे. या संवादातून गावकऱ्यांच्या भावना, स्थानिक प्रश्न तसेच पक्षाच्या भूमिकेबाबत मिळालेला फीडबॅक शिबिरात मांडावा लागणार आहे. दरम्यान, या शिबिराची सध्या जोरदार तयारी सुरू असून, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून नियोजनाला वेग आला आहे.
आज नाशिकमध्ये पाहणी करणार
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिबिर समन्वयक आशुतोष शिर्के आणि राजाराम पानगव्हाणे रविवारी (दि. २३) नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. शिबिरासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या स्थळांची पाहणी करण्यासोबतच गंगापूर धरण परिसरातील रिसॉर्ट आणि शिबिराच्या अनुषंगाने सुरू असलेल्या अन्य तयारीचा आढावा ते घेणार आहेत.
नो बॅनरबाजी, साधेपणाने स्वागत
खासदार राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी रिसॉर्ट परिसरात कोणतेही फलक लावले जाणार नाहीत. शिबिराचे संपूर्ण आयोजन अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, शिबिराच्या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींनाही प्रवेश दिला जाणार नाही.
‘जेन झी’ सोबत संवादाचा प्रस्ताव
दरम्यान, शिबिरादरम्यान राहुल गांधी यांनी ‘जेन झी’ अर्थात नव्या पिढीतील तरुणांशी संवाद साधावा, असा प्रस्तावही आम्ही देणार आहोत. तसेच, नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि ठिकठिकाणी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांची वस्तुस्थितीही राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करणार असून नाशिकच्या रस्त्यांवरील समस्यांची प्रत्यक्ष माहिती देत व पाहणी करत या प्रश्नावर त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं शहराध्यक्ष निलेश खैरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.