Sangamner, 06 February : देशाच्या पंतप्रधानांपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सर्वजण ज्यांना दादा म्हणून संबोधायचे, असे आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा पवार यांना एवढ्या लवकर श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल, असं कधीही वाटलं नव्हतं. पण नियतीनं ती वेळ आपल्यावर आणली आहे. अजितदादांचा स्वभाव रोखठोक होता, पण त्यामागे एक प्रामाणिकता आणि स्पष्टवक्तेपणा असायचा. रोखठोक बोलण्याचा त्यांना अनेकदा तोटाही झाला, अशा शब्दांत आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या अजितदादांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
संगमनेर येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत सत्यजित तांबेंनी (Satyajeet Tambe) दादांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, अनेक लोक राजकारण डोळ्यासमोर ठेवून नुसतं गोडगोड बोलत असतात. पण काही लोक हो ला हो आणि नाही ला नाही म्हणण्याची दानत ठेवत असतात. ती अजितदादांमध्ये होती. दादांचा आणि माझा अत्यंत जवळचा सहवास राहिलेला आहे. त्यांनी अनेकदा मला मार्गदर्शन केले आणि कान टोचले. त्यांच्या मुलांशी ते जसे बोलले असतील तसा संवाद त्यांनी माझ्याशी केला. याचा मला आनंद आहे.
मी २००७ मध्ये जिल्हा परिषदेचा सदस्य झाल्यापासून अजितदादांचा (Ajit Pawar) आणि माझा संपर्क होऊ लागला. आमच्यात राजकीय चर्चा होऊ लागल्या. सत्यजित सांगतो, त्यात तथ्य असेल, असा विश्वास त्यांना येऊ लागला. त्यांनी अनेकदा जाहीर व्यासपीठावर ही गोष्ट सांगितली आहे, असेही तांबे यांनी नमूद केले.
ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी माझ्या काही सहकाऱ्यांसाठी तिकिट मागायला गेलो, त्यावेळी माझ्या शब्दावर शिंदेसेनेबरोबर मैत्रीपूर्ण लढत करून उमेदवारांना संधी दिली. उमेदवारांना त्यांनी पाहिलेसुद्धा नव्हते, फक्त माझ्या भरोशावरच त्यांनी तिकिटं दिलं होतं, त्यामुळे ते रात्री फोन करून सांगायचे, बघ बरं का, तुझी जबाबदारी आहे, तुझ्या शब्दावरच तिकिट दिलेलं आहे. पाहिजे ते कर पण सीट निवडून आलं पाहिजे. आणि ज्यावेळी ते आमदार आम्ही त्यांच्यासमोर नेऊन उभे केले, त्यावेळी त्यांनी मला मिठ्ठी मारून ‘मानलं बाबा तुला’ अशा शब्दांत दादांनी माझं अभिनंदन केलं होतं.
ती २०१२-१३ ची गोष्ट आहे, ती सांगितलीच पाहिजे. त्यांच्याकडं अर्धवट माहितीच्या आधारावर कोणी जाऊ शकत नव्हतं. तयारी नसेल आणि अजितदादांनी एखादा प्रश्र विचारला तर तिथल्या तिथंच त्यांचं पोस्टमार्टम व्हायचं. त्यामुळे दादांसमोर विचारपूर्वक जायला लागायचं. नागपूरमधील माझ्या एका कार्यकर्त्याचं काम घेऊन मी दादांना पुण्याला त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेटलो. माझ्या नागपूरच्या कार्यकर्त्यांचं काम आहे, तेवढं करावं लागतंय, अशी विनंती केली, असे तांबे यांनी नमूद केले.
दादा म्हणाले, ते काम होणार नाही, नियमात बसत नाही, त्यामुळे शक्य नाही. त्यावेळी मी ठीक आहे म्हणून बाहेर पडलो. पाच ते सहा महिन्यांनी पुन्हा दादांकडं जायचं ठरवलं. मी मंत्रालयात गेलो, तेव्हा दादा खाली उतरत होते. त्यांनी मला पाहिलं आणि विचारलं सत्यजित इकडं काय करतो, अशी विचारणा केली. त्यावर मी काही नाही, एक काम होतं महत्वाचं. बोलायचं होतं, असं म्हणताच, त्यांनी मला गाडीत बस अशी सूचना केली, असे आमदार तांबे यांनी सांगितले.
ते म्हणाले, गाडीत बसल्यावर दादा मला म्हणाले, बोल काय? मी म्हटलं काय नाही मागं तुम्हाला एक विषय सांगितला होता, तो झाला तर बरं होईल. त्या कार्यकर्त्याची लाईन लागून जाईल. त्यावर दादांनी ‘अरं तुला सांगितलं ना ते होणार नाही...’ असे स्पष्ट करून त्यांंनी त्यांच्या ड्रायव्हरला सांगितलं की ए...गाडी थांबव...याला उतरव खाली.’ मला अक्षरशः निम्म्या रस्त्यात गाडीतून खाली उतरवलं. विशेष म्हणजे मला त्याचं अजिबात वाईट वाटलं नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.