

Solapur News: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत 102 जागांपैकी तब्बल 87 नगरसेवक जिंकून आणत भाजपनं एकहाती सत्ता काबीज केली होती. यानंतर सत्तास्थापन,महापौर,उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस शहरात मोठ्या राजकीय हालचाली सुरू होत्या. अखेर या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यांत एका अटीवर बाजी पालटल्याचं दिसून आलं.
सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल यांची तर, उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची शुक्रवारी (ता.6 फेब्रुवारी) बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे प्रियदर्शन साठे आणि एमआयएमचे तौफिक हतुरे यांनी अखेरच्या क्षणी माघारी घेतली. यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर,उपमहापौर पदाच्या बिनविरोध निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला.यासंबंधीची घोषणा पीठासीन अधिकारी यांनी केली.
सोलापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी महापौर,उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ऐनवेळी माघार घेण्यामागचं कारण सांगितलं. ते म्हणाले, आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर,उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपकडून समान निधी देण्याच्या शब्दावर माघार घेतली आहे.
तसेच दुसरीकडे सोलापूर महानगरपालिकेत एकेकाळी प्रमुख सत्ताधारी पक्ष राहिलेल्या काँग्रेसचे 102 जागांपैकी अवघे 2 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आठ जागा जिंकत सोलापूर महानगरपालिकेच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारलेल्या एमआयएम पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद जाण्याची दाट शक्यता आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख आणि देवेंद्र कोठे यांनी भारतीय जनता पक्षाला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठं यश मिळवून दिलं आहे. हे सोलापूरमहानगरपालिकेच्या इतिहासातील आतापर्यंतचं भाजपचं सर्वांत मोठे यश मानलं जात आहे.
या अभूतपूर्व यशानंतर सोलापूर महापौरपदासाठी भाजपकडून विनायक कोंड्याल आणि उपमहापौरपदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, महापालिकेत सध्याचं भाजपचं बहुमत लक्षात घेता दोघांचा विजय निश्चित मानला जात होता.
सोलापूर महापालिकेच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाने आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी विनायक कोंड्याल यांना, तर उमहापौरपदासाठी ज्ञानेश्वरी महेश देवकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या विजयाच्या घोषणेची औपचारिकता तेवढी बाकी आहे. महापौरपद आपल्या गोटाकडे खेचून घेत आमदार कोठे यांनी दोन्ही देशमुखांना पहिल्याच टर्ममध्ये चेकमेट केल्याचं सोलापूरच्या राजकारणात बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.