Maharashtra update : अंगणवाडीत पोषण आहार बनवणाऱ्या सेविका, आदिवासी, शेतकरी, कर्मचारी आणि कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या लाँग मार्च पुढं राज्यातील भाजप महायुती सरकारनं माघार घेतली.
राज्यातील कामगार, कष्टकऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या 14 विविध मोठ्या मागण्या तत्काळ लागू करण्यास सरकारच्यावतीनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री दादा भुसे यांनी शब्द दिल्याची माहिती किसान सभेचे राज्य सचिव अजित नवले यांनी दिली. मागण्या मंजूर होताच, लाँग मार्चमधील कष्टकऱ्यांनी मोठा आनंद व्यक्त केला.
संगमनेरच्या (Sangamner) निझर्णेश्वर इथून लाँग मार्च आज भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी इथल्या गावात धडकणार होता. तत्पूर्वीच अजित नवले यांच्याशी सरकारकडून संपर्क साधला जात होता. बैठका होत होत्या. परंतु या बैठकांना काही यश आलं नाही.
आज लाँग मार्चचा चौथा दिवस होता. मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि मंत्री दादा भुसे यांनी लाँग मार्चचं नेतृत्व करणारे अजित नवले यांच्याशी चर्चा सुरू केली होती. पण मार्ग निघत नव्हता. आंदोलनातील नवले व पदाधिकारी मागण्यांवर ठाम होते.
वनजमिनी, तळ जमिनीच्या मागण्यांसह अर्धवेळ परिचारक कर्मचारी आणि शालेय पोषण कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात मोठे निर्णय झाले. अर्धवेळ परिचारक कर्मचाऱ्यांच्या मानधनात दोन हजार रुपये तर, शालेय पोषण कर्मचाऱ्यांच्या मानधनात एक हजारांची वाढीच्या मागणीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
तसंच राज्यातील बांधकाम कामगारांच्या मेडिक्लेम योजनेसह 14 मागण्या मान्य करण्यात आल्या. याशिवाय वन जमिनी आणि तळ जमिनीबाबत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू कराव्यात, असे आदेश दोन्ही मंत्र्यांनी प्रशासनाला दिले.
राजूर (ता. अकोले) ते अहिल्यानगर, असा लाँगमार्चला चार दिवसापूर्वी सुरवात झाली होती. अखिल भारतीय किसान सभा आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनकडून या लाँग मार्चचं नेतृत्व डाॅ. अजित नवले यांनी केलं. लाँग मोर्च सुरू होताच, पोलिसांमार्फत अजित नवले यांना नोटीस बजावण्यात होती. यावर 'दडपशाहीला न जुमानता लाँग मार्च निघणारच, आम्ही घामाचे दाम मागतोय, सरकारच्या छातावर आम्ही जाणारच,' असा इशारा अजित नवले यांनी दिला होता.
आज हा लाँग मार्च मंत्री विखे पाटील यांचे गाव लोणी इथं पोहोचणार होता. तत्पूर्वी संगमनेर इथं झालेल्या सभेत अजित नवले यांनी पुणतांबा इथल्या शेतकऱ्यांच्या संपाची आठवण करून देत, कष्टकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दुसरा मोठा संप जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी या गावापासून महाराष्ट्रभर सुरू होणार होईल, असा इशारा दिला होता.
मंत्री विखे पाटील आणि मंत्री भुसे यांनी लाँग मार्चमधील आंदोलकांना समोरे जात यशस्वी शिष्टाई करत, वेगवेगळ्या 14 मागण्या सरकारच्यावतीनं मंजूर केल्याची माहिती दिली, अजित नवले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. हा कष्टकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असला, तरी मागण्यांवर सरकार कसं काम करतं, यावर आंदोलनाची पुढची दिशा ठरेल, ही लढाई अजून संपलेली नाही, असेही अजित नवले यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.