NCP MLA Supports Anna Hazare Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP MLA Supports Anna Hazare : महायुतीत 230 हून अधिक आमदार, पण एकानेच घेतली अण्णांची बाजू! विधिमंडळाच्या भर सभागृहात सरकारला खडसावलं

Irony Maharashtra politics: MLA from same NCP once opposed Anna Hazare now urges government accept his demands before indefinite hunger strike begins : माहिती अधिकार कायद्याच्या नियमावलीत राज्य सरकारने केलेल्या बदलांवरून अण्णा हजारे संतप्त झाले असून, बेमुदत उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Pradeep Pendhare

Anna Hazare Hunger Strike Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत अनपेक्षित आणि चर्चेचा विषय ठरणारी घडामोड समोर आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संबंध नेहमीच संघर्षाचे राहिले आहेत.

मात्र आता ज्या पक्षाशी अण्णांचा सर्वाधिक संघर्ष झाला, त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने अण्णांच्या समर्थनार्थ सरकारलाच थेट आवाहन केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.

माहिती अधिकार कायद्याच्या नियमावलीत राज्य सरकारने केलेल्या बदलांवरून अण्णा हजारे (Anna Hazare) संतप्त झाले असून, त्यांनी येत्या 5 जुलैपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी विधिमंडळात थेट सरकारलाच अण्णांच्या मागण्यांची दखल घेण्याची विनंती केली.

अधिवेशनादरम्यान बोलताना काशिनाथ दाते म्हणाले की, “अण्णा हजारे यांचे वय आता 90 वर्षे आहे. या वयात त्यांना आंदोलनासाठी उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देऊ नका. सरकारने (Mahayuti Government) तातडीने त्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा.” विशेष म्हणजे अण्णांचे सामाजिक कार्य अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी आणि पारनेर परिसराशी जोडलेले असल्याने स्थानिक पातळीवरही या भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, माहिती अधिकार कायद्याच्या नियमावलीत करण्यात आलेले बदल रद्द करण्याच्या मागणीवर अण्णा हजारे ठाम आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर 5 जुलैपासून ते बेमुदत उपोषण सुरू करतील. मात्र अद्याप सरकारकडून ठोस तोडगा किंवा अधिकृत संवाद झालेला दिसत नाही.

अजित पवारांविरोधात याचिका

या घडामोडीत सर्वात जास्त चर्चेत आहे ती अण्णा हजारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जुना संघर्ष. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अण्णा हजारे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.

चार मंत्र्यांवर आरोप, अन् उपोषण आंदोलन

याआधी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात अण्णा हजारे यांनी चार मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत बेमुदत आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची तीव्रता इतकी वाढली होती की तत्कालीन सरकारला निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमावा लागला होता.

मलिक, आव्हाडविरोधांत संघर्ष

इतकंच नाही तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी पूर्वी अण्णा हजारे यांच्यावर ‘आरएसएसचे एजंट’ असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अण्णांनी या वक्तव्यांवर तीव्र आक्षेप घेत मानहानीचे दावे दाखल करण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली होती.

महायुती सरकारला प्रशासनाला केलं पुढं

आता पुन्हा एकदा अण्णा हजारे सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे राज्यात सध्या महायुती सरकारला 230 पेक्षा अधिक आमदारांचे संख्याबळ आहे आणि त्यामध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेत सहभागी आहे. अशा परिस्थितीत, ज्या पक्षाशी अण्णांचा इतिहासभर संघर्ष राहिला, त्याच पक्षाच्या आमदाराने सभागृहात अण्णांच्या बाजूने उभे राहत सरकारला, अण्णांना उपोषणाची वेळ येऊ देऊ नका, अशी विनंती केल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. या वादग्रस्त दुरुस्तीप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती आयुक्त राहुल पांडे यांना राळेगणसिद्धी येथे अण्णांशी चर्चेसाठी पाठवले होते. मात्र दीर्घ बैठकीनंतरही कोणताही तोडगा निघू शकला नाही.

वाढदिवसाला संपर्क, संघर्षावेळी...

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र आता अण्णांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकार आणि प्रशासनाकडून अपेक्षित संवाद होत नसल्याची नाराजी माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. आता 5 जुलै जवळ येत असताना सरकार अण्णांच्या मागण्यांवर काय निर्णय घेते आणि अण्णा हजारे प्रत्यक्ष उपोषणाला बसतात का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT