Nashik Crime News : नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आज न्यायालयात मोठी घडामोड पाहायला मिळाली. सरकारी पक्षाने खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील ओकस कार्यालयातील झाडाझडतीत काही महत्त्वाचे पुरावे, विशेषतः काळा दगड आढळला असल्याचे सांगितले. हा काळा दगड व महिलांचे लैंगिक शोषण करताना तो काहीतरी पुटपुटत असे, त्याबाबत अधिक तपास करायचा असल्याचे सांगत तीन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली.
मात्र खरातच्या वकिलांचा युक्तिवाद सरकारी पक्षावर भारी पडल्याने न्यायालयाने खरातला पोलिस कोठडी देण्यास नकार दिला व त्याला 12 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाने पहिल्यांदाच खरातची पोलिस कोठडी नाकारली.
दरम्यान खरात प्रकरणात यापूर्वी ओशनो जल, चिंचोके, रिंगमेजरमेंट अशा विविध गोष्टींचा उल्लेख झाला. आता या प्रकरणात काळा दगडाचाही उल्लेख झाल्याने गुढ आणखी वाढले आहे. खरातला त्याच्यावर दाखल असलेल्या आठव्या गुन्ह्यात एसआयटीने गुरुवार (दि. ३०) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केलं होतं व पोलिस कोठडीची मागणी केली. एसआयटीने आज कोर्टात तो काळा दगड आणला होता. त्यावरून आरोपीचे वकील आणि सरकारी वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला.
सुनावणीवेळी तपास अधिकाऱ्याने तपासाची माहिती कोर्टाला दिली. त्यानंतर सरकारी वकिलानेही युक्तिवाद केला. काळ्या दगडाचं गूढ अद्याप उकललं गेलं नाही. इतर गुन्ह्यांमध्ये काळा दगड मिळाला नव्हता तो पहिल्यांदा या गुन्ह्यात मिळाला आहे. काळा दगड त्याने कशासाठी ठेवला होता? त्याची काय भानगड आहे याचा तपास करायचा आहे. तसेच पीडित कुटुंबाची त्याने आर्थिक फसवणूक केल्याचाही संशय असून, आरोपीच्या समक्ष चौकशी होणे गरजेचे आहे असे सांगत सरकारी पक्षाने पोलिस कोठडीची मागणी केली.
यावेळी खरातच्या वकिलांनी तपास यंत्रणेचा युक्तिवाद खोडून काढताना आक्रमक पवित्रा घेतला. या काळ्या दगडाचा काय तपास करणार? असा सवाल खरातच्या वकिलांनी केला. सीसीटीव्ही व जुन्या तपासाचा दाखला देत त्यांनी पोलीस कोठडीची गरज नसल्याचा प्रभावी युक्तिवाद केला. आर्थिक व्यवहारांचा संशय आहे असे इतर गुन्ह्यात नमूद नाही, मग आताच हे कसे आले? असा सवाल केला. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी एसआयटीची पोलीस कोठडीची मागणी अमान्य केली. खरातला 12 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
परंतु खरातविरोधात एसआयटीकडून एकुण 9 गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. त्यामुळे SIT ने ९ व्या गुन्ह्यात पुन्हा अशोक खरातचा ताबा मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. उद्या पुन्हा अशोक खरातला कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यामुळे एसआयटी नवव्या गुन्ह्यात खरातला पुन्हा ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.