Nashik Ashok Kharat News : राज्यात मोठी चर्चा ठरलेल्या नाशिक इथला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राज्य सरकारने न्यायालयीन लढाई अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
या बहुचर्चित प्रकरणातील खटल्यांमध्ये सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी राज्य सरकारने अहिल्यानगरचे अनुभवी फौजदारी वकील परिमल फळे यांची सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. यासंदर्भातील अधिसूचना राज्याच्या विधी व न्याय विभागाने जारी केली आहे.
या प्रकरणात यापूर्वीच राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. आता त्यांच्या टीममध्ये ॲड. परिमल फळे यांची भर पडल्याने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारतर्फे (Government) विधी व न्याय विभागाचे कक्ष अधिकारी राजेश मांजरेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, अशोक खरातविरोधातील न्यायालयीन प्रक्रियेत सरकारची बाजू मांडण्याची जबाबदारी आता ॲड. उज्ज्वल निकम आणि ॲड. परिमल फळे या दोघांवर असणार आहे.
अहिल्यानगरमधील ॲड. परिमल फळे हे फौजदारी कायद्यातील अनुभवी वकील म्हणून ओळखले जातात. राज्यभर गाजलेल्या राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्य हत्या प्रकरण, तसेच नेवासा येथील ॲड. रियाज पठाण हत्या प्रकरणातही त्यांनी सरकारतर्फे उज्ज्वल निकम यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका बजावली होती. या संवेदनशील खटल्यांमध्ये दोघांनी मिळून सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली होती.
याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक चर्चित गुन्हेगारी प्रकरणांमुळे ॲड. परिमल फळे यांनी न्यायालयीन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बहुचर्चित रेखा जरे खून प्रकरण, तसेच पारनेर येथील संदीप वारळ हत्या प्रकरणासह अनेक महत्त्वाच्या फौजदारी खटल्यांमध्ये त्यांनी यशस्वीपणे बाजू मांडली आहे.
दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने पुन्हा एकदा उज्ज्वल निकम आणि परिमल फळे या अनुभवी जोडीवर विश्वास दाखवल्याने या खटल्याच्या पुढील सुनावणी आणि न्यायालयीन लढतीला आता अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यभर चर्चेत असलेल्या या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.