Sinnar STICE controversy News : नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील श्री जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत भोंदू अशोक खरात याने ३२ बनावट खाती उघडून सुमारे ५८ लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून या प्रकरणात खरातला सिन्नर न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याच प्रकरणात सहभाग निष्पन्न झाल्याने खरातचा निकटचे सहकारी व पतसंस्थेचे संस्थापक तसेच सिन्नर (स्टाईस) सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष आणि श्री शिवनिका संस्थानचे माजी सरचिटणीस नामकर्ण आवारे यांनाही सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे.
नामकरण आवारे यांना अटक झाल्यानंतर सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत (स्टाइस) येथे अध्यक्ष बदलाच्या मागणीने वातावरण तापले आहे. कथित आर्थिक गैरप्रकारात आवारे यांचे नाव आल्याने वसाहतीची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करत विरोधी संचालकांनी सत्ताधारी गटाने आवारे यांना दिलेला अध्यक्षपदाचा पाठिंबा तातडीने काढून घ्यावा, अशी जोरदार मागणी लावून धरली आहे.
सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहत अर्थात स्टाइसमध्ये १२ संचालकांपैकी आठ संचालक सत्ताधारी गटाचे असून त्यामध्ये नामकर्ण आवारे यांचाही समावेश आहे. तर चार संचालक विरोधी गटात आहेत. विरोधी संचालक अविनाश तांबे, पंडित लोंढे, सुधा माळोदे आणि बाबासाहेब दळवी यांनी याबाबत संयुक्त निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भोंदू अशोक खरात याच्याशी आवारे यांचे निकटचे संबंध असल्याची माहिती वसाहतीतील संचालक व सभासदांना आहे. अशा परिस्थितीत वसाहतीच्या प्रतिमेला धक्का बसूनही सत्ताधारी संचालक आवारे यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा कायम ठेवत आहेत. त्यामुळे खरात यांच्या कथित गैरकृत्यांना अप्रत्यक्ष समर्थन दिले जात असल्याचा आरोपही विरोधी गटाने केला आहे.
जगदंबा माता पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात आवारे यांना अटक झाल्यानंतरही सत्ताधाऱ्यांनी मौन बाळगणे अनैतिक असल्याचे विरोधी संचालकांचे म्हणणे आहे. सभासदांनी संस्थेच्या हितासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी संचालकांची निवड केली असून सत्ताधाऱ्यांनी याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी निवदेनाद्वारे केली आहे.
दरम्यान अटक झाल्यानंतर शुक्रवारी (दि. १५) आवारे यांनी अध्यक्षपदाच्या कामकाजातून १५ दिवसांची रजा मंजूर करण्याबाबतचा अर्ज स्टाइस कार्यालयात पाठविला असून त्यावर विरोधी संचालकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. संस्थेच्या हिताचा व प्रतिमेचा विचार करुन आवारे यांना चेअरमनपदावरुन पायउतार केले पाहीजे अशी मागणी संचालक अविनाश तांबे यांनी केली आहे. (Nashik News)
दरम्यान, या सर्व घडामोडींवर बोलताना "सहकार कायद्याच्या चौकटीत राहून जे योग्य असेल तो निर्णय सत्ताधारी संचालक घेतील. आवारे यांच्यावर अद्याप गुन्हा सिद्ध झालेला नाही. संस्थेत उद्योजकांच्या हिताचे काम व्हावे, राजकारण होऊ नये' अशी प्रतिक्रिया स्टाईसचे उपाध्यक्ष रामदास डापसे यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.