Ashok Kharat fraud : भोंदूबाबा अशोक खरात याचे एक-एक कारनामे सातत्याने समोर येत आहे. भोंदूगिरीच्या नावाने त्याने अनेक महिलांचे लैगिंक शोषण केले असून त्यासंदर्भात गुन्हे दाखल झाले आहे. आता त्याने पुण्यातील एका व्यापाऱ्याला अवतारपूजेच्या नावाने तब्बल पाच कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे देखील समोर आले आहे.
राजेंद्र अशोक जासूद असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. हे व्यापारी मुळचे पुण्यातील हडपसर येथील आहेत. जासूद यांच्या फिर्यादीनुसार नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत वासनांध कॅप्टन अशोक खरात याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. खरातवर दाखल झालेला हा आठवा गुन्हा आहे.
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक असलेले राजेंद्र अशोक जासूद हे २०१८ मध्ये देश-परदेशात लॉजिस्टिकच्या व्यवसायात यश मिळावे, यासाठी वासनांध कॅप्टन अशोक खरातच्या संपर्कात आले. परंतु जासूद हे भोंदूबाबाच्या नादी लागून तब्बल पाच कोटी रुपये गमावून बसले.
भोंदू खरातने बांधकाम व्यावसायिक जादूस यांना अवतारपूजा करावी लागेल असे सांगितले. त्यासाठी २१ देशांतील मातीचे पूजन करावे लागेल मग त्यातून शक्ती प्राप्त होऊन लॉजिस्टिकच्या व्यवसायात भरभराट होईल, असे सांगितले. त्यापूर्वी ईशान्येश्वर मंदिरात नागदेवतेची पूजा करावी लागेल असेही सांगितले. पूजेवेळी नागदेवतेचे दर्शन देत त्याच्या मनात मृत्यूचीही भीती घातली. खर्चात काटकसर केल्यास नागदेवता कोपेल, नागदेवतेच्या दंशाने तुझा मृत्यू होईल, तुझ्यावर काळी जादू करून तुझा मृत्यू घडवून आणेन, अशा स्वरूपाच्या धमक्या त्याने जासूद यांना दिल्या होत्या. त्यामुळे मृत्यूच्या भीतीने जासूद हे भोंदू खरात सांगेल ते करायला तयार झाले.
अवतारपूजेपूर्वीच त्याने जासूद यांच्याकडून त्यांची मर्सिडीज कार बळकावली. जासूद यांच्या पैशावर अवतारपूजेच्या नावाखाली २०१९ ते २०२३ यादरम्यान भोंदू खरात ग्रीनलँड, म्यानमार, युगांडा, इजिप्त, आयर्लंड, श्रीलंका, कंबोडिया, बांगलादेश या देशांमध्ये फिरला. विविध पूजाविधीसाठी भोंदू खरातने जासूद यांच्याकडून लाखो रुपये उकळले. खरातने स्वत:च्या वैद्यकीय उपचारासाठी चार वेळा अमेरिका वारी केली त्याचा खर्चही जासूद यांच्याकडून घेतला.
कोट्यवधी रुपये जाऊनही व्यवसायात कोणतीही प्रगती न झाल्याने बांधकाम व्यावसायिक जासूद यांनी खरातकडे पैशांची मागणी केली असता, खरातने उलट नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी येथील पोलिस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक जासूद यांच्या विरोधातच खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे आता वावी पोलिसही संशयाच्या भोवऱ्यात आले असून, त्यांनी भोंदू खरातच्या दबावापोटी की आर्थिक लागेबांध्यातून गुन्हा दाखल केला यासंदर्भात एसआयटीकडून वावी पोलिसांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.