Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातचे रोज नवनवीन कारनामे समोर येत असून अनेक राजकीय नेते देखील त्याच्यामुळे अडचणीत सापडले आहे. असे असताना अंधश्रद्धा निर्मुलन समितीने आणखी एक संशय व्यक्त करत खळबळ उडवून दिली आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीने म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील एक लोकप्रतिनिधी भोंदू कॅप्टन खरातच्या संपर्कात होते. द्वारका येथे काही कोटी रुपये खर्च करून अद्ययावत 'नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक' बांधण्यात आली. परंतु काही वर्षांपूर्वी सदर इमारतीतून बॅंकेचे कामकाज सीबीएस जवळच्या जुन्या इमारतीत हलवले गेले.
खरे तर द्वारका येथील बँकेचे ठिकाण मोक्यावर व ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना येण्या-जाण्यास सोयीस्कर होते. सदर कामकाज हलविण्याबाबत जे कारण समोर आले होते. ते अत्यंत धक्कादायक आहे असं अंनिसने म्हटलं आहे. पूर्वी त्या ठिकाणी स्मशानभूमी असल्याने बॅंकेच्या नवीन इमारतीत आर्थिक प्रगती होत नसल्याचे बोलले गेले होते. त्यामुळेच कर्ज वसुलीचा दर देखील खुंटला होता, असे संचालकांचे अंधश्रद्धायुक्त मत होते असा आरोप अंनिसने केला आहे.
याबाबत भोंदू खरातच्या सल्ल्याने जिल्हा बँक स्थलांतरित केली का? असा संशय अंनिसने व्यक्त केला आहे. कारण बँकेच्या स्थलांतर करण्याचा आग्रह धरणारा संचालक यापूर्वी एका निवडणुकीत निवडून येण्यासाठी चक्क भोंदू कॅप्टन खरातने त्यांचा प्रचार केला होता. त्यात ते विजयी झाले होते. तशी माहिती पोलिस प्रशासनाला दिली असल्याचे अंनिसने सांगितले.
या शिवाय याच लोकप्रतिनिधीने निवडणुकीनंतर अंबड वेअरहाउस येथे मतदान यंत्र सुरक्षित रहावे म्हणून तथाकथित जादूटोणा केला होता. शिवाय इतर कुणी त्याच्या यंत्रावर जादूटोणा करून त्याची मते दुसऱ्याला जावू नये म्हणून खाजगी सुरक्षारक्षक नेमले होते असाही आरोप अंनिसने केला आहे.
या लोकप्रतिनिधींच्या निवडणूक प्रचारात भोंदू कॅप्टन १९९९ पासून सामील असल्याने वरील प्रकरणात भोंदू कॅप्टन खरातचा हात होता का, याची चौकशी व्हावी अशी मागणी अंनिसने केली आहे. संबधित तत्कालीन मंत्री आपल्या शासकीय, प्रशासकीय कामकाजाच्या बैठका या भोंदू खरातच्या सल्ल्याने, मुहूर्त विचारून आयोजित करत असत असेही समजल्याचे अंनिसने म्हटले आहे.
नाशिक शहर व जिल्ह्यातील काही तथाकथित अध्यात्मिक पंथ, संप्रदायांच्या प्रमुखांची अशोक खरातच्या भोंदूगिरीत भागीदारी होती की काय असा संशय अंनिसने व्यक्त केला आहे. कारण काही पंथ जादूटोणावर विश्वास ठेवणारे आहेत. त्यामुळे त्याबद्दलही पोलिसांनी त्या अंगानेही सखोल चौकशी करावी असे अंनिसने म्हटले आहे.
१९९९ च्या प्रचारात विरोधी उमेदवाराने एका बाबाला बोलाविले होते. त्याला पर्याय म्हणून सदर लोकप्रतिनिधीने भोंदू कॅप्टन खरातला आपल्या प्रचारात उतरविले होते. त्याचा संबंध तपासावा, अशी विनंती पोलिस प्रशासनाला केली असल्याचे अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले.
खरात-बडे बाबा कनेक्शन तपासावे
तसेच निफाड तालुक्यातील भोंदू बडे बाबा उर्फ गणेश जयराम जगताप हा काळी विद्यासाठी कुप्रसिद्ध आहे. जादूटोणासाठी कुप्रसिद्ध असलेले कामाख्य देवीचे राज्यातील पहिले ५५ कोटीचे मंदिर त्याने निफाड तालुक्यात बांधले आहे. भोंदू कॅप्टन खरातचे व या बडेबाबाचे एकमेकांशी संबंध होते का याचाही तपास करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र अंनिसच्या वतीने राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, महेंद्र दातरंगे आदींनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.