Ashok Kharat sexual exploitation case : महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात याच्याविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. खरातविरोधात दाखल झालेला हा गुन्हा मास्टरस्ट्रोक ठरला आहे. या प्रकरणात फिर्यादीने चक्क गुप्तहेराप्रमाणे खरातच्या घरात स्वयंपाकी (कुक) पाठवून त्याच्याकडून या भोंदूची माहिती मिळवली. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी फिर्यादीतील माहिती आहे.
बॅंकिंग लोन कन्सल्टंट व खरातचा सीए राहिलेल्या ललित प्रकाश पोफळे यांनी खरातने आपल्याला मृत्युयोगाची भीती दाखवून तसेच शक्तिपीठ महामार्गालगत मालमत्ता खरेदीच्या आमिषातून तब्बल आठ कोटी ७६ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यात ललित पोफळे यांनी पोलिसांना जी माहिती दिली त्यातून खरातच्या कुकर्मांच्या पुराव्यांचा पेराटाच खुला झाला आहे.
ललित पोफळे याने आपल्या मर्जीतील एका तरुणास खरातकडे अनेक महिने कुक म्हणून नोकरीस ठेवून खरातच्या काळ्या कृत्याचा भंडाफोड केल्याचे तपासात उघड झाले आहे. खरातचे काळे कारनामे बाहेर काढण्यामागे त्याचा ऑफिसबॉय नीरज जाधवनंतर आता या कुकचीही भूमिका महत्वाची ठरली आहे.
खरातने त्याच्या मिरगाव येथील फार्महाउसवर जेवण बनवण्यासाठी स्वयंपाक्याची (कूक) गरज असल्याचे ललित पोफळे यांना सांगितलं होतं. खरातवर त्यांना संशय आल्याने त्यांनी एखाद्या गुप्तहेराप्रमाणे आपल्या मर्जीतील एकाला कूक म्हणून खरातच्या फार्महाउसवर पाठवले. त्याचा पगारही ललित पोफळे देत असत. याच कूक ने फार्महाऊसवर खरातच्या कुकर्मांचे पुरावे गोळा केले आहेत. हे पुरावे आता एसआयटीच्या हाती लागले आहेत.
आजवर खरात याच्या लैंगिक शोषणाचे जे व्हिडिओ समोर आले ते त्याच्या नाशिक येथील कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस कार्यालयात छुप्या कॅमेऱ्यातील होते. मात्र खरात फार्महाऊसवर देखील पीडित महिलांना नेत असल्याचे समोर आले आहे. या कुकची ड्यूटी फार्म हाऊसवर होती. फार्महाऊसवर महिलांना आणले की, खरात हा कूकला सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यासाठी सांगत असे परंतु, हा कुक कॅमेरे बंद करीत नसे. खरातचा एकेकाळचा विश्वासू ललित पोफळे याने जी फिर्याद खरातच्या विरोधात दाखल केली त्यात कुकबाबतचा हा धक्कादायक खुलासा केला आहे.
खरात जेव्हा थकत असे, तेव्हा फार्महाऊसवर किमान दोन रात्र थांबत असे. रात्री काही महिलांसोबत आतमध्ये दारू पीत असे, त्यांच्यासोबत अश्लील चाळे करीत असे. हे सर्व तेथील सीसीटीव्हीत कैद झाले आहे, असे पोफळे याने फिर्यादीत म्हटले आहे. हे सारे बिंग पोफळे यांनीच खरातकडे पाठविलेल्या कूकमुळे फुटले आहे. (Nashik News)
भोंदू अशोक खरातचा विश्वासू म्हणून ललित पोफळेची ओळख होती. मीरगाव येथील शिवनिका संस्थानच्या कार्यकारिणीवर संचालक राहिलेले ललित प्रकाश पोफळे (रा. वरळी) हे खरातचे सीएही होते. परंतु खरात पूजाविधीच्या नावाखाली हातचलाखीने पेटीतून नाग काढून बनाव रचत होता. खरातच्या या अनैतिक कृत्यांचा व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह पोफळेंच्या हाती लागला होता. खरातने पोफळे यांनाही आठ कोटींचा चुना लावला. त्यानंतर खरातच्या दैवी चमत्कारांबद्दलचा त्यांचा विश्वास उडाला. त्यांनी त्यानंतर शिवनिका संस्थानवरील विश्वस्तपदावरून स्वत:ला दूर केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.