

Ahilyanagar News: महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवून दिलेल्या नाशिकमधील अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस समोर येत असलेल्या धक्कादायक खुलाशांमुळे अधिकाधिक गंभीर होत चालले आहे. खरातनं एकीकडे महिलांचे लैंगिक शोषण करतानाच भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचंही समोर आलं आहे. याबाबत त्याच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांनंतर आता खरात प्रकरणात दुसरी मोठी विकेट पडली आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील समता नागरी पतसंस्थेच्या शाखेत भोंदूबाबा अशोक खरात याची वारसदार असलेली शेकडो खाते असल्याचं आढळून आली होती. यात रुपाली चाकणकरांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाच्या खात्याचाही समावेश आहे. ज्यांच्या नावावर ही खाती आहेत, त्यांची शिर्डी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
याचदरम्यान, अशोक खरात कनेक्शनमुळे कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल अन् गैरव्यवहाराचे गंभीर आरोप होत असल्यामुळे समता पतसंस्थाही अडचणीत आली आहे. या पतसंस्थेच्या आर्थिक कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. अशातच आता समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी त्यांच्याकडे असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
काका कोयटे हे गेल्या अनेक वर्षांपासून राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष होते.पण त्यांना अशोक खरात प्रकरण भोवलं आहे. याच पार्श्वभूमीवर कोयटे यांच्या राजीनाम्याची मागणी पतसंस्थेच्या सभासदांकडून जोरदारपणे सुरू झाल्याची माहिती समोर आली होती. या सगळ्या घडामोडींनंतर कोयटे यांनी अखेर आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
शिर्डी पोलिसांकडून अशोक खरात प्रकरणात समता पतसंस्थेतील 100 संशयास्पद खात्यांची चौकशी सुरू आहे. मात्र,समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांनी या प्रकरणात पतसंस्थेत कायदेशीर प्रक्रिया पाळली गेल्याचा दावा केला होता. मात्र,या 100 खात्यांच्या तपासामुळे समता पतसंस्थेच्या अडचणीत वाढल्या आहेत. या प्रकरणाशी संबंधित रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या खात्यातून 2 कोटींच्या वर आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आले असून, या खात्याला वारसदार म्हणून अशोक खरातचे नाव असल्याची माहिती आहे.
काका कोयटेंनी राजीनामा दिलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशच्या अंतर्गत राज्यभरातील सुमारे 15 हजार पतसंस्था काम करत असल्याची माहिती आहे.जवळपास या फेडरेशनचे 6 हजार सभासद आहेत. कोयटे हे या फेडशनचे 2015 च्या पूर्वीपासून अध्यक्ष राहिले होते.मात्र, काही दिवसांपूर्वी अशोक खरात आणि समता परिषदेचे संबंध असल्याचे समोर आले होते, त्यामुळे त्यांच्यावरील दबाव वाढला होता,
नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांकडून तब्ब्ल आठ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात राजकीय संबंध असल्याची चर्चा सुरू झाल्याने तपासावरही सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. खरात याच्या विरोधात शिर्डीत सावकारीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. चाकणकर यांच्या खात्यांमधील मोठ्या व्यवहारांमुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे
प्रतिभा चाकणकर यांनी ही खाती आपली नसल्याचा दावा केला आहे. ही खाती सुरू करताना अर्जावर करण्यात आलेल्या सह्या बनावट आहेत. त्या सह्या आपण केलेल्या नाहीत. खाते व्यवहारात एकही रुपयांची आपली उलाढाल नाही. तसेच पोलिसांनी कोणतीही नोटीस आपल्यापर्यंत पोहोचली नाही, असेही प्रतिभा चाकणकर यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.