How Turkish honey was allegedly sold for lakhs: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांचे एक-एक काळे कारनामे समोर येत असून ते संपेना झालेत. त्याच्याकडे येणाऱ्या हायप्रोफाईल भाविकांना त्याने लाखो रुपयांना चुना लावल्याचे समोर आले आहे. चिंचुके, बनावट खडे यानंतर आता 'तुर्की मध' विक्रीच्या नावाखालीही त्याने हायप्रोफाईल भक्तांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केल्याचे तपासातून पुढे आले आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, भोंदूबाबा अशोक खरात हा 'तुर्की मध' हे कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचे सांगत असे. विशेषतः लैंगिक अडचणींवर उपाय म्हणून हे मध प्रभावी असल्याचा दावा तो करायचा. त्याच्याकडे लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्या उद्योजक आणि राजकीय नेत्यांना महागड्या दरात मधाची विक्री करायचा. धक्कादायक म्हणजे एक किलो मधाची बाटली तब्बल 9 लाख रुपयांना विकायचा अशी माहिती समोर आली आहे.
खरातने या मधाला एल्विश हनी असे नाव दिले होते. हे मध तुर्कीतील समुद्राच्या खोल गुहांमधून मिळते, असे खोटेनाटे सांगून तो वेड्यात काढायचा. हे मध दुर्मिळ असल्यानेच या मधाची किंमत इतकी आहे असे सांगून तो भक्तांचा विश्वास संपादन करत असे व त्यांना हे मध लाखो रुपयांना विकत असे. तुर्कस्थानातील मध असल्याची थाप सोडत त्याने असे अनेकांना गंडवल्याचे उघड झाले आहे.
तसेच महागड्या दराने मध विक्री करून आलेली रक्कम त्याच्या ट्रस्टच्या नावे घेत ब्लॅक मनी व्हाईट केल्याचं तपासात समोर आले आहे. खरातने अनेक वेगवेगळे फंडे वापरुन हायप्रोफाईल लोकांची कशाप्रकारे लूट केले ते आता एक-एक करुन समोर येत आहे.
त्यामध्ये चिंचोके, खडे, तांत्रिक विधी आणि महागडे मध, अशा विविध माध्यमांतून अशोक खरातने लोकांच्या अंधश्रद्धेचा आणि वैयक्तिक अडचणींचा गैरफायदा कसा घेतला याचा उलगडा झाला आहे. बारातून किलो दराने आणलेले चिंचोके, खडे तो प्रतिनग १ लाख रुपये दराने विकायचा असेही यापूर्वी तपासात समोर आले आहे.
दरम्यान, अशोक खरात विरोधात आता तक्रारी करण्यासाठी पिडीत महिला पुढे येऊ लागल्या आहेत. धार्मिक विधी, लग्न जमवून देणे, पूजाविधी, भविष्य सांगणे अशा वेगवेगळ्या बहाण्याने अशोक खरातने महिलांवर अत्याचार केलेत. खरातवर आता एकूण 6 गुन्हे दाखल झाले आहेत. अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार असून त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यामुळे आज कार्टाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.