Ahilyanagar Assembly Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar Assembly Constituency : 'तुतारी' आणि 'घड्याळ' सामना? नगर शहरात शरद पवारांच्या राजकीय खेळाची चर्चा

Maharashtra Assembly Elections 2024 : अहिल्यानगर शहर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीत ही जागा कोणाला सुटणार याची उत्सुकता असतानाच, बंडखोरी रोखण्याचे आव्हान पक्ष नेत्यांसमोर असेल.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहर मतदार संघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून खेचून घेण्यासाठी महाविकास आघाडीने चांगलाच जोर लावला आहे. तर आमदार संग्राम जगताप यांनी 'सबकुछ हम', असे म्हणत पुन्हा शड्डू ठोकला आहे.

महाविकास आघाडीतील पक्षांकडून इच्छुकांची संख्या अधिक असली, तरी उमेदवार निश्चित झाल्यानंतर बंडखोरी रोखण्याचं आव्हान पक्ष नेत्यांसमोर असणार आहे. तसंच शहरावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्चस्व असले, तरी शरद पवार हा मतदार संघ खेचून घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत राजकीय दंगलीची उत्सुकता वाढली .

अहिल्यानगर शहर विधानसभा मतदार संघात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. अजितदादा राज्यात 'गुलाबी' रंग घेऊन फिरत असताना, आमदार जगताप यांनी 'पिवळ्या' रंगाला प्राधान्य दिलं आहे. आमदार जगताप यांनी केलेल्या बॅनरबाजीवर सर्वाधिक 'पिवळा' रंग दिसत होता. ही विसगंती विरोधकांच्या नजरेतून सुटलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या 'शिवस्वराज्य यात्रे'च्यावेळी या विसंगतीवर खासदार अमोल कोल्हे यांनी 'प्रहार' केला.

'तुतारी' जागा खेचून घेणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून इच्छुकांमध्ये सर्वात पुढे युवा चेहरा अभिषेक कळमकर आहे. त्यांनी शिवस्वराज्य यात्रेनंतर मतदार संघात गाठीभेटींवर भर दिलाय. यात मुंबईतून महाविकास आघाडीतील जागा वाटपांविषयी मोठी अपडेट समोर येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांचा दबदबा असल्याने त्यांच्या वाट्याला तिथं सर्वाधिक जागा जाणार आहेत. त्यात अहिल्यानगर शहर विधानसभा मतदार संघाच्या जागेचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि कोकणात जागा वाढवून घेतल्या आहेत. जागा वाटपाचा हा तिढा, प्रत्यक्षात जागा वाटपाची माहिती समोर येताच समजेल. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाकडून इच्छुक सर्वाधिक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ज्येष्ठ नेते प्रा. शशिकांत गाडे, शशिकला राठोड, भगवान फुलसौंदर, गिरीश जाधव, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम यांची नावे आघाडीवर आहेत. शिवसेना ठाकरे पक्षांकडून वाढलेल्या इच्छुकांची संख्या पाहता इथं बंडखोरीची शक्यता अधिक वाटते. काँग्रेसने देखील मतदार संघावर दावा केला आहे. शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, मंगळ भुजबळ यांनी तयारी सुरू केली आहे.

संदीप कोतकरांच्या भूमिकेकडे लक्ष

महाविकास आघाडीत इच्छुकांची संख्या अधिक असल्याने, बंडखोरीची अधिक शक्यता आहे. याचाच फायदा आमदार संग्राम जगताप यांनी घेत, प्रचारावर फोकस केला आहे. संघटनावर भर दिला आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष अहिल्यानगर मतदार संघात नेमकं कोणतं राजकारण करतं, याकडे देखील लक्ष लागलं आहे. माजी महापौर संदीप कोतकर यावेळी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांच्याकडून चाचपणी सुरू आहे. अभिषेक कळमकर यांच्याबरोबर संदीप कोतकर यांचे नाव तुतारीकडून सर्वाधिक चर्चेत आहेत. त्यामुळे नगरकरांची राजकीय उत्सुकता शिगेला पोचली आहे.

जागेबाबत नेत्यांकडून फक्त आश्वासन

दरम्यान, मध्यंतरी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेत्यांच्या गाठीभेटीवर भर दिला होता. स्थानिक नेत्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी घेत, जागा आम्हालाचे सोडा, अशी मागणी केली होती. या दोन्ही नेत्यांनी जागा नेमकी कोणाला, या नेत्यांनी त्यावेळी स्पष्ट केले नव्हते. पण, या नेत्यांनी महाविकास आघाडीकडून एक संघपणे निवडणुकीला समोरे जायचे एवढेच सांगत होते. पण ही जागा कोणाकडे हे स्पष्ट केले नाही. जागा वाटपाची चर्चा सुरू असताना, ही जागा नेमकी कोणाकडे जाणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT