Assembly Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar Election: काय व्हायचं ते होऊ देत! पाच माजी आमदारांनी पक्षादेश झुगारला

Former MLA Rebel in Ahilyanagar: अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघापैकी आठ मतदारसंघात बंडखोरी झाली असून, त्यात सहा पैकी पाच माजी आमदारांनी पक्षादेश झुगारून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झालं आहे.

या बारा मतदारसंघात असलेल्या सहा पैकी पाच माजी आमदारांनी पक्षादेश झुगारून दिले. या पाच माजी आमदारांवर पक्षाकडून काय कारवाई होते, याकडे आता लक्ष लागलं आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी आठ मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीतील पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी ही बंडखोरी केली आहे. ही बंडखोरी रोखण्यात दोन्हींकडचे प्रयत्न अपुरे ठरले. या आठ मतदारसंघात तिरंगी लढती होतील. यात पाच माजी आमदारांनी अपक्ष किंवा इतर आघाड्याकडून मैदानात उतरलेत. या माजी आमदारांची भूमिकेची पक्षांनी दखल घेतल्याचे समजते. तत्पूर्वी या माजी आमदारांची समजूत काढण्यासाठी काल अर्ज मागे घेण्याच्या दिवशी खूप खल झाला. बैठका झाल्या. शब्द दिले गेले, परंतु तोडगा निघाला नाही. काही माजी आमदार संपर्कात राहिले नसल्याने पक्ष प्रमुखांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

अकोले विधानसभा मतदारसंघात भाजपचे (BJP) माजी आमदार वैभव पिचड यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला. पिचड यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या कार्यकर्त्यांनी भरला. श्रीरामपूर मतदारसंघात महायुतीमध्ये पेच निर्माण झालेला आहे. काँग्रेसने तिकीट कापल्यानंतर आमदार लहू कानडे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घेतली. याचवेळी महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी माजी आमदार कांबळे दिवसभर मोबाईल बंद करून होते.

नेवासा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिथे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. श्रीगोंदा मतदारसंघात माजी आमदार राहुल जगताप यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. पारनेरमध्ये शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

शेवगाव मतदारासंघात राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र पिपाडा यांनी माघार घ्यावी म्हणून, चार्टर प्लेन पाठवून पक्षश्रेष्ठींनी मुंबईला बोलावून घेत, त्यांची मनधरणी केली. पण, ती यशस्वी ठरली नाही. अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. ते वेगळा निर्णय घेतील, असे सांगितले जात आहे.

प्रा. गाडेंवरील कारवाई थांबवली

महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांची गंभीर दखल घेतली आहे. यात आघाडीवर आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. शिवसेना ठाकरे पक्षाने पक्षविरोधी कृती केलेल्या पाच नेत्यांना पक्षातून निलंबित केले आहे. यात रुपेश म्हात्रे (भिवंडी ), विश्वास नांदेकर (जिल्हाप्रमुख, यवतमाळ), चंद्रकांत घुगूल (झरी तालुकाप्रमुख), संजय आवारी (मारेगाव तालुकाप्रमुख), आणि प्रसाद ठाकरे (वणी तालुकाप्रमुख) यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. परंतु अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यावरील कारवाईची विषय प्रलंबित ठेवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT