Ahilyanagar News : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात सरळ लढतीचे चित्र स्पष्ट झालं. मात्र या दोघांची डोकेदुखी 'नाव साधर्म्य' उमेदवारांनी वाढवली आहे. भाजपचे आमदार शिंदे यांच्या नावासारखे तीन, तर आमदार पवार यांच्या नावासारखे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
यात रोहित पवार यांचे चिन्ह 'तुतारी' असले, तरी अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांना 'ट्रम्पीट' चिन्ह मिळाले आहे. याच चिन्हाने लोकसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाची डोकेदुखी वाढवली होती. तसंच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तब्बत 44 हजार मते घेतली होती. त्यामुळे आमदार रोहित पवार यांची 'नाव साधर्म्य' उमेदवार आणि त्याचे 'ट्रम्पीट' चिन्ह चांगलीच डोकेदुखी वाढवणार, असे दिसते.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीचे प्रतिस्पर्धी असणारे महायुतीकडून भाजपचे (BJP) आमदार प्रा. राम शिंदे, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यातच पुन्हा सरळ लढत रंगणार आहे. दोन्ही प्रमुख उमेदवारांनी आपल्यावर नाराजी असणाऱ्याचे मन वळविण्यात यशस्वी झाले. मंत्री राधाकृष्ण विखे समर्थक असणारे अंबादास पिसाळ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वकील कैलास शेवाळे यांनी आपले उमेदवारी अर्ज अखेरच्या क्षणी माघारी घेतले. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहे.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. प्रतिस्पर्धी असणारे आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवारांचा (Rohit Pawar) राजकीय संघर्ष प्रचारापूर्वीच शिगेला पोचलाय. दोन्ही तुल्यबळ नेते एकमेकांना कायम कडवा विरोध करताना संपूर्ण राज्याने पाहिला आहे. हाच कडवा संघर्ष आगामी काळात प्रचारानिमित्ताने आणखी तीव्र होईल.
अंबादास पिसाळ आणि वकील कैलास शेवाळे यांच्या भूमिकेकडे मतदारसंघाचे लक्ष लागले होते. दोन्ही भूमिपुत्रांनी माघार घेतली अन् भूमिका पक्षासोबत ठेवली. यासह मनसेचे रवींद्र कोठारी, रासपाचे स्वप्नील देसाई इतर आठ असे एकूण 12 जणांनी आपले विधानसभा उमेदवारी अर्ज माघारी घेतले. कर्जत-जामखेडसाठी 11 उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीकरीता मैदानात राहिले आहे. आमदार रोहित पवार आपला बालेकिल्ला कायम राखतात की, आमदार राम शिंदे त्यांना धोबीपछाड देतात? याकडे लक्ष राहणार आहे.
प्रा. रामदास शंकर शिंदे (भाजप), रोहित राजेंद्र पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष), दत्तात्रय आत्माराम सोनवणे (बसपा), करण चव्हाण (आरपीआय), राम प्रभू शिंदे (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), सोमनाथ भैलुमे (वंचित), राम नारायण शिंदे (अपक्ष), रोहित चंद्रकांत पवार (अपक्ष), शहाजी उबाळे (अपक्ष), सतीश कोकरे (अपक्ष) आणि हनुमंत निगुडे (अपक्ष)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.