Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ShivSenaUBT : संजय राऊतांनी जागा विकली; शिवसैनिकांची 'मविआ'त बंडखोरीची तयारी

Ahilyanagar City Constituency : अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना'UBT' पक्षाला सुटण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्यानंतर शिवसैनिक बंडाची तयारी करत आहेत.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदरी निराशा पडल्याने अस्वस्थ झालेले शिवसैनिक आता बंडाच्या तयारीत आहेत. पक्षश्रेष्ठींवर संताप व्यक्त करत, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या निषेधाच्या आणि जागा विकल्याचा आरोप शिवसैनिक करत आहेत.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे आणि माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच मंगळवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. ही बंडाळी रोखण्याचं आव्हान महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक आणि प्रदेश पातळीवर नेत्यांसमोर असणार आहे.

शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेत्यांची रविवारी बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जागा विकल्याचा आरोप केला. संजय राऊत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांनी शहर विधानसभा मतदारसंघाचे सलग 25 वर्षे प्रतिनिधीत्व केले.

हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. लोकसभा निवडणुकीला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला खासदारकीला संधी दिली. आता माघार नाही, असे म्हणत मं शिवसैनिकांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे.

'मविआ'त पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना'UBT' पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षात काही जागांवर अदलाबदली होणार असल्याचे संकेत होते. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर शहर आणि श्रीगोंदा मतदारसंघाची जागा आदलबदली झाली.

श्रीगोंदा मतदारसंघातून अनुराधा नागवडे यांना शिवसेना'UBT' पक्षाकडून उमेदवारी दिल्यानंतर नगर शहर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला सुटणार अशी चर्चेने जोर धरला होता. त्यानुसार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने युवा नेते अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर केली.

या सर्व पार्श्वभूमीवर शिवसैनिकांची रविवारी बैठक झाली. शहरप्रमुख संभाजी कदम, युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, योगीराज गाडे, गिरीश जाधव, संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेलाच तिकीट हवे होते, असा सूर पदाधिकाऱ्यांनी अवळला.

शहर शिवसेनाच हवी. इथं संरक्षणाचा मुद्दा प्राधान्याने आहे. शिवसैनिकच शहराचे रक्षण करू शकतो. गेली दहा वर्षे शहराचे विकासासह अन्य सामाजिक विषयांचे नुकसान झाले आहे, ते भरून काढण्यासाठी शिवसेनेला इथं संधी हवी, अशी चर्चा बैठकीत झाली.

"शिवसेनेच्या प्रश्नांची उत्तर पक्षश्रेष्ठींकडून न मिळाल्यास बंडखोरी अटळ असून, नगर शहरातील शिवसैनिक एकसंघपणे विचार करून निवडणुकीला समोरे जाईल. तसंच तत्पूर्वी सर्व शिवसैनिक आपल्या पदाचे राजीनामा देतील", असा इशारा देण्यात आला आहे.

अंतिम निर्णय घेण्यासाठी अहिल्यानगर शहर मतदारसंघासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज सोमवारी दुपारी आयोजित केल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT