Marriage Rituals Code of Conduct Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Marriage Code of Conduct : वैष्णवी हगवणेचा हुंडाबळी; आता लग्नसोहळ्यासाठी आचारसंहिता, शिवरायांच्या आरतीसह 'या' प्रथांना बंदी

Vaishnavi Hagwane Dowry Death Sparks Wedding Reforms: बद्रिनाथ तनपुरे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर इथं झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत लग्नसोहळ्यासाठी आचारसंहिता जाहीर करण्यात आली.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Maratha Community Meeting : पुण्यातील वैष्णवी हगवणे हिची आत्महत्या हुंडाबळी ठरली. हगवणे-कस्पटे लग्नसोहळ्यावर कस्पटे कुटुंबांनं मुलीकडचे म्हणून पाण्यासारखा पैसा खर्च केला. त्याची यादीत आता समोर आली आहे. हुंडाबंदी कायदा असताना, लग्नसोहळ्यात मुलींकडच्यांनी दिलेले दागिने, वाहनं आणि इतर पैसा, हे देखील या प्रकरणात समोर आलं आहे.

लग्नसोहळा आता दोन्ही कुटुंबांसाठी, मग कोणत्याही समाजाचा असो, तो प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. लग्नात कोण काय वेगळं करत, काय भव्यदिव्यता दाखवलं जातं, याची स्पर्धाच सरू आहे. मुला-मुलींकडच्या दोन्ही कुटुंबाच्या मनोमिलनाऐवजी लग्नसोहळा भव्यदिव्यतेचा विषय ठरला आहे. परंतु वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर, हुंडाबळीनंतर आता मराठा समाजाने विवाह समारंभासाठी आचारसंहिता जाहीर केली आहे. यासाठी अहिल्यानगरमधील मराठा समाजानं पुढाकार घेतला आहे.

मराठा (Maratha) समाजाने विवाह समारंभासाठी जाहीर केलेल्या आचारसंहितेत, हुंडा घेऊ नका, देऊ नका, तसेच लग्नात डिजे व प्री-वेडिंगला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विवाह सोहळा केवळ 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीत पार पाडावा, असे महत्त्वाचे निर्णय मराठा समाजाने घेतले आहेत. आचारसंहितेचे पालन उत्कृष्टपणे करणाऱ्या तीन पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे, तसेच आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी 11 जणांची सुकाणू समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.

बद्रिनाथ तनपुरे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन एन. बी. धुमाळ फाउंडेशनने नगरमध्ये केले होते. या बैठकीत मराठा समाजातील लग्नसोहळ्यावर (Marriage) होत असलेल्या दिखाऊपणावर आणि त्यातील अनावश्यक खर्चावर चर्चा झाली.

माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, सकल मराठाचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे, अखिल भारतीय मराठा संघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे, जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य कार्याध्यक्ष राजश्री शितोळे, पत्रकार किशोर मरकड, मराठा वधू-वर सूचक मंडळाचे अशोक कुटे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, विठ्ठल गुंजाळ, सी. ए. ज्ञानेश्वर काळे उपस्थित होते.

तनपुरे महाराज म्हणाले, "समाजाने अनिष्ट रूढींना तिलांजली द्यावी. समाजात बदल करण्यासाठी प्रत्येकाने प्रथम बदल करावा. सर्वांनी एकत्र येऊन लग्न समारंभातील आचारसंहितेची अंमलबजावणी करावी. त्यासाठी तालुकावार समिती स्थापन करण्यात यावी".

डॉ. निमसे म्हणाले, "लग्नसोहळ्याच्या आचारसंहितेची जनजागृती घेण्यासाठी कीर्तनकार, प्रबोधनकारांनी पुढाकार घ्यावा. हुंडाबळी याबरोबरच समाजातील ग्रामीण मुलांच्या विवाहाचीही समस्या मोठी आहे. यावरही गांभीर्याने विचार करावा लागेल".

शिवरायांची आरती बंद करा

सध्या अनेक लग्न समारंभात छत्रपती शिवरायांची आरती करण्याची प्रथा रूढ होत आहे. ही प्रथा तत्काळ बंद करावी, अशी मागणी सी. ए. ज्ञानेश्वर काळे यांनी केली. शिवराय हे आपले दैवत आहेत. त्यांना देवत्व बहाल करू नये.

स्वराज्याची निर्मिती करताना त्यांनी केलेला पराक्रम प्रेरणादायी आहे. त्यांची आरती कुणीही करू नये. नाहीतर काही वर्षांनी त्यांचा पराक्रम पुसला जाईल व त्यांना देवत्व बहाल केले जाईल. महाराजांची आरती कोणीही कुठेही लावू नये अथवा ऐकू नये, अशी विनंतीही काळे यांनी केली.

आचारसंहितेत काय काय...

- 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा

- डीजे नको, पारंपरिक वाद्य आणि लोक कलावंतांना पसंती

- प्री- वेडिंग बंद करावे, केलेच तर जाहीर दाखवू नये

- नवरा-नवरीला हार घालताना वर उचलून घेऊ नये

- कर्ज काढून लग्नात खर्च करू नये

- नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा

- लग्नात फक्त वधूपिता आणि वरपिता यांनीच फेटे बांधावेत

- भेटवस्तूऐवजी पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख आहेर करावेत.

- देखावा करू नये, लग्नात हुंडा देऊ-घेऊ नये.

- इच्छा असेल, तर मुलीच्या नावावर एफडी करावी

- जेवणात पाच पेक्षा जास्त पदार्थ नकोत

- लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करावी

- दशक्रिया विधी पाचव्या दिवशी करावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT