Pankja Munde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pankaja Munde : ‘वैद्यनाथ’ निधी संकलनातून पंकजा मुंडे यांनी राजकीय मैदान मारले!

Sampat Devgire

Munde on vaidyanath Sugar GST News : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने १९ कोटी कर थकविल्याने ‘जीएसटी’ने नोटीस दिली होती. यावर जे जे घडले ते अक्षरश: प्रत्येक गोष्ट पॉलिटीसाइज करण्याचा पारंपरिक भाग आहे. त्यात मुंडे जिंकल्या, मात्र त्याचवेळी त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेला नक्कीच बाधा आली हे लपून राहिलेले नाही. (Munde wins in a political game on BJP`s internal politics)

भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ कारखान्याला (Cooperative) ‘जीएसटी’ने ग्राहकांकडून गोळा केलेले १९ कोटी शासनाला (Maharashtra) जमा न केल्याने जप्तीची नोटीस पाठविली. यावर मोठे राजकारण रंगले.

या प्रकरणात वैद्यनाथ साखर कारखाना आणि ज्येष्ठ नेते (कै) गोपीनाथ मुंडे यांचे भावनिक नाते व त्याविषयी त्या समाजात आपुलकी असल्याचे दिसून आले. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राज्य शासनाला अर्थातच पंकजा मुंडे ज्या पक्षाचे नेतृत्व करतात, त्याच पक्षाच्या सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

गेले आठवडाभर या विषयावर समाजमाध्यमांतील चर्चा, शासनावरील टीका तसेच निधी संकलनाची मोहीम झाली. त्यातून त्यांना कोणाला लक्ष्य करायचे होते, हेदेखील लपून राहिलेले नाही. यामध्ये पंकजा मुंडे नक्कीच यशस्वी झाल्या. मात्र, त्याचे न दिसणारे परिणामदेखील आहेत. त्यात भाजपचे सरकार चालविणारे दुखावले गेले असणार हीदेखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे.

या प्रकरणाचे राजकीय लाभ, हानी काय हे भविष्यात दिसेल. मात्र, मुंडे यांनी अपेक्षेप्रमाणे हा निधी नाकारला, असे घडेल हा अंदाज सगळ्यांनाच अगदी सुरुवातीलाच होता. मात्र, भावनिक राजकारण असल्याने त्यावर जाहीर प्रतिक्रिया आल्या नाहीत.

या कारखान्यावरील नोटीस म्हणजे काय हेदेखील समजून घेतले पाहिजे. ही नोटीस कोणत्याही प्रकारे करआकारणी नव्हती. वैद्यनाथ कारखान्याने जी साखर विक्री केली, त्याद्वारे त्यांनी ज्यांना साखर विक्री केली, त्यांच्याकडून शासनाच्या वतीने ‘जीएसटी’ वसूल केला होता.

याविषयी कारखान्याने शासनाला स्वतःच प्रकटीकरण दिले होते. त्यानुसार जो सरकारी कर वसूल केला, तो सरकारी तिजोरीत जमा करायचा असतो, तो त्यांनी केला नाही. हा गंभीर गुन्हा आहे. त्यानुसार मुदत दिली जाते. शेवटचा पर्याय म्हणून जप्ती केली जाते. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. सरकारचा जो कर संकलित केला, तोच ‘जीएसटी’ला जमा करायचा आहे. त्यात त्या चुकल्या. ही एक सामान्य प्रशासकीय प्रक्रिया आहे. त्यात सरकार अथवा कुठल्या मंत्र्यांचा काहीही संबंध नसतो. अर्थात अनुयायांना वास्तव काय यापेक्षा भावना महत्त्वाच्या ठरतात. हेच या प्रकरणात घडले. त्यात पंकजा मुंडे यांची आज तरी सरशी झाली, हे नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT