Beed Politics : आई कधीही लेकराच्या ताटातले घेत नाही. त्यामुळे मला फक्त आशीर्वाद द्या, असे भावनिक आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.
पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी विभागाने थकीत 19 कोटी रुपयांच्या जीएसटीप्रकरणी जप्तीची कारवाई सुरू केली. तेव्हापासून आम्ही वर्गणी करून ही रक्कम त्यांच्या थोबाडावर फेकू म्हणत राज्यभरातून मुंडे समर्थकांनी मदतीचे अभियान सुरू केले आहे. अगदी लाखापासून पन्नास लाख रुपयांपर्यंत रक्कम देऊ करत हे धनादेश गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावे लिहण्यात आले. मात्र, पंकजा मुंडे यांनी आता हा निधी नको, अशी भूमिका घेतली आहे. मला केवळ आशीर्वाद द्या, असे भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.
पंकजा मुंडे यांनी एक व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये शेअर केला आहे. त्यात त्यांनी ' माझ्या अडचणीत आपण सर्व उभे राहिलात यामुळे गहिवरून आले आहे. आपण ज्या पद्धतीने मदत देत आहात, ते खरंच आपलं मोठेपण आहे. आपल्या घरातलं किडूक मिडूक विकून आपण जे मदत निधीवर शून्यावर शून्य लावत आहात ते डोळे दीपवणारं आहे, पण आता तसं करू नका. यातून काय मार्ग काढायचा यासाठी मी वकिलांचे, सीए'चे सल्ले घेत आहे, त्यातून मी योग्य मार्ग काढेल. त्यामुळे तुम्ही मला पैसे देऊ नका, फक्त आशीर्वाद द्या... गोपीनाथ मुंडे साहेबांनी आपल्यात स्वाभिमान पेरला आहे. आपण त्याच स्वाभिमानाने या प्रसंगातून जाऊ, पण मी देणारी आहे. कितीही वाईट वेळ आली तरी आई आपल्या लेकराच्या ताटातलं घेत नाही. कोणी कितीही टीका केली तरी मी तुमच्या आईच्या भूमिकेत आहे. तुम्ही २० कोटीचं काय ४० कोटीसुद्धा जमवाल; पण तुमच्या संसारातलं, तुमच्या लेकरांच्या लग्नासाठी ठेवलेलं असं मला नको... फक्त साथ, प्रेम आणि आशीर्वाद द्या' असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
गेल्या दोन अडीच वर्षांपासून पंकजा मुंडेंना भाजपकडून (BJP) डावलले जात असल्याचे थेट आरोप समर्थक करत आहेत. अलीकडेच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या केंद्रीय सहकार खात्याकडून राज्यातील अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली. मात्र, पंकजा यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला मात्र मदत मिळाली नाही. उलट जीएसटी आयुक्तालयानेच कारखान्यावरील जीएसटीच्या थकीत १९ कोटी रुपयांसाठी वैद्यनाथ कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. कारखान्यावरील या कारवाईमुळे आता त्यांच्या समर्थकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.