Balasaheb Thorat Vs Radhakrush Vikhe Patil  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Thorat Vs Vikhe: गांधी मैदानातून पवारांच्या साक्षीने थोरातांनी मंत्री विखे यांच्या दहशतीला दिले आव्हान

Nagar Lok Sabha Constituency 2024: विखे महसूलमंत्री आहेत आणि यांचे दौरे नगर जिल्ह्यापुरतेच आहेत. कनोली-मनोली-चनेगाव-हसनापूर आणि महाराष्ट्राचे मंत्री!, असा चिमटा थोरात यांनी विखेंना काढताच जनसमुदायांमध्ये हशा पिकला. विरोधी पक्षनेते असतानादेखील हे नगर जिल्ह्यापुरतेच मर्यादित होते.

Pradeep Pendhare

Nagar News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नेते राज्याचे महसूल तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या दहशतीला शरद पवार यांच्या उपस्थितीत नगरच्या गांधी मैदानातून थेट आव्हान दिले. राहात्यासह नगरमधील (Nagar Lok Sabha Constituency 2024) त्यांची दहशत मोडून काढण्याची वेळ आली आहे. यासाठी सर्वसामान्यांनी नीलेश लंके (Nilesh Lanke) यांना निवडून देऊन दिल्लीला पाठवावे, असे आवाहन थोरात यांनी उपस्थितीत जनसमुदायाला केले.

नीलेश लंके यांनी एक एप्रिलपासून सुरू केलेल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आज नगर शहरातील गांधी मैदानात समारोप झाला. या समारोप सभेला शरद पवार, आदित्य ठाकरे, रोहित पवार, भूषणसिंह होळकर, राजेंद्र फाळके, दादा कळमकर, अभिषेक कळमकर, विक्रम राठोड, प्रतापराव ढाकणे, संभाजी कदम उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात यांनी गांधी मैदानातून थेट मंत्री राधाकृष्ण विखे यांना थेट आव्हान दिले. आपल्याकडे अजून बरंच काही बोलायला आहे. पुढील काही दिवस सर्वच काही निघेल. मंत्री विखे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करून निवडणुकीचा रोख बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्यावरदेखील टीका करून निवडणुकीची दिशा बदलत आहेत. या गांधी मैदानात प्रचंड जनसमुदाय दिसतो. जनसमुदायाचा करंट दोन हजार होल्टचा असेल, असे थोरात यांनी इशारा दिला.

शरद पवार यांनी नीलेश लंके यांना उमेदवारी दिल्यानंतर सगळे वातावरणच बदलले. मी राज्यातील ज्येष्ठ आमदार आहे. परंतु नीलेश लंके यांची क्रेझ सगळ्या राज्यात आहे. नीलेश लंके हा जिवाला जीव देणारा माणूस आहे. कोविड काळामध्ये नवरा-बायको एकमेकांकडे पाहत नव्हते. परंतु हा माणूस रोग्यांची सेवा करत होता. आतासुद्धा नीलेश लंके सर्वसामान्यांसाठी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलाय. 19 दिवसांपासून सुरू असलेली स्वाभिमान जनसंवाद यात्रेत त्यांचे नऊ किलो वजन कमी झाले आहे. शाळेत, मंदिरात मुक्काम केलाय. या यात्रेत त्यांना अपघात झाला. परंतु नीलेश लंके मागे हटायला तयार नाहीत. दुचाकीवर असलेल्या नीलेश लंके यांच्यावर दुसरी दुचाकी येऊन धडकली. त्या दुचाकीचे सायलेन्सर 50 फूट लांब उडून पडला. परंतु नीलेश लंके मोटारसायकलवरून हटले नाहीत. यात्रा चालूच ठेवली. दुचाकीचे सायलेन्सर 50 फुटांवर लांब जाऊन पडले, तर समोरच्यांचे काय होईल, याचा विचार करावा. नीलेश लंकेला धडक देणारा आता कोठल्या कोठे जाऊन पडेल याचा विचार समोरच्यांनी करावा, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावताच जनसामुदायातून प्रचंड जल्लोष झाला.

थोरात यांनी मंत्री विखेंची उडवली खिल्ली!

बाळासाहेब थोरात यांनी मंत्री विखेंची यावेळेस चांगलीच खिल्ली उडवली. हे राज्याचे महसूलमंत्री आहेत आणि यांचे दौरे नगर जिल्ह्यापुरतेच आहेत. कनोली-मनोली-चनेगाव-हसनापूर आणि महाराष्ट्राचे मंत्री!, असा चिमटा थोरात यांनी विखेंना काढताच जनसमुदायांमध्ये हशा पिकला. विरोधी पक्षनेते असतानादेखील हे नगर जिल्ह्यापुरतेच मर्यादित होते.

पुत्राच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष होण्यासाठी पवारांवर टीका!

मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अचानक शरद पवार यांच्यावर बोलायला सुरुवात केली. याचे कारण अजून समजले नाही. लोकसभेची निवडणूक आहे. देशाच्या प्रश्नावर बोलले पाहिजे. त्याचे उत्तर दिले पाहिजे. आपल्या उमेदवाराचे कौतुक केले पाहिजे. परंतु कर्तृत्ववान सुपुत्राने काय केले आणि काय कर्तृत्व गाजवले, याकडे दुर्लक्ष करण्यासाठी मंत्री विखे यांनी शरद पवार आणि माझ्यावर टीका करायला सुरुवात केल्याचे थोरात यांनी म्हटले. मी तर आत्तापर्यंत एकदाच बोललो आहे ही निवडणूक श्रीमंताविरुद्ध सर्वसामान्यांची आहे. परंतु कर्तृत्ववान मुलावर आरोप व्हायला लागल्याने आणि त्याला उत्तर देता येत नाही, तो बोलला का आणखी काहीतरी वेगळेच चॅनेल चालतो. परंतु या निवडणुकीमध्ये विषय आहे. नीलेश लंके आणि सुजय विखे यांच्यावर चर्चा केली पाहिजे, असे थोरात यांनी म्हटले.

पटवर्धन पतसंस्थेतील घोटाळ्यांची माहिती आमच्याकडे!

मंत्री विखे यांनी संपदा पतसंस्थेच्या गैरव्यवहारातील प्रकरणात संस्थाचालकांना राजाश्रय दिल्याचा आरोप केला होता. यावर बाळासाहेब थोरात यांनी परखड मत मांडले. राजकीय आश्रय दिला असता तर ते तुरुंगात जाऊन बसले नसते. परंतु आम्ही चुकीच्या कामाला कधीही राजाश्रय देत नाही. प्रवरा बँकेत नगरमधील रावसाहेब पटवर्धन संस्था विलीन केली. प्रवरा बँकेचे प्रमोटर हे मंत्री महोदय होते. रावसाहेब पटवर्धन पतसंस्था चालवला घेतल्यानंतर त्यात काय-काय घोटाळे झाले, हे सर्व आम्हाला माहीत आहे. दोन ते तीन महिन्यांपूर्वी एक मोर्चादेखील यासंदर्भात निघाला होता. ठेवीदारांनी ठेवी देण्याबरोबरच महसूलमंत्र्यांनी मंत्री पद सोडावं, अशा मागणीचे निवेदन दिल्याची आठवण बाळासाहेब थोरात यांनी या वेळी करून दिली.

राहात्यामधील गणेश सहकारी कारखाना आम्ही घेतला म्हणून तो सुरू आहे. राहुरीमधील कारखान्याची काय परिस्थिती आहे हे तेथे आम्ही सभेत सांगू, असादेखील इशारा बाळासाहेब थोरात यांनी या वेळी दिला. आणखी खूप प्रश्न आहेत. राहात्यामधील दहशत आम्ही मोडून काढण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक होऊ द्या. नंतर दोन-चार महिने असाच कार्यक्रम चालणारच आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की, ज्यावेळेस पवारांवर आरोप होता. अशावेळी लक्ष दुसरीकडे वेधण्याचा कार्यक्रम चालू आहे हे लक्षात ठेवा का. यांच्या चिरंजीवांनी काम केलं आहे, तर ते काय आहे? कुठे होते पाच वर्षे? काय केलं, कोणते प्रश्न सोडवले? त्याबद्दल सांगा.

या नगर शहराची शांतता सुव्यवस्थेमध्ये कोणती त्याने मदत केली? याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. ते दिल्लीला जाऊन काय करायचं, ते माहीत नाही. खरी लोकशाही दाखवण्याची जबाबदारी ही तुमच्या आमच्यावर आहे. देशाची लोकशाही वाचवण्याची आणि राज्यघटना वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. यांची दहशत मोडणार आहोत, हे लक्षात ठेवा. तुमची सगळ्यांची साथ पाहिजे. या निवडणुकीमध्ये तुम्ही नीलेश लंके यांना विजयी करा आपण संपूर्ण जिल्हा व्यवस्थित करण्याचं काम पुढच्या काळामध्ये करू, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT