Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील भाजप महायुती सरकारने शेतकऱ्यांना दोन ला रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याबरोबरच, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना केली.
या कर्जमाफीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, 'चार लाखांची कर्जमाफी द्यायला हवी होती, दिलेली कर्जमाफी काळानुसार अतिशय तुटपुंजी आहे', अशा शब्दात भाजप महायुती सरकारच्या कर्जमाफीवर टिप्पणी केली.
बाळासाहेब थोरात म्हणाले, "महाविकास आघाडी सरकारने 2019 मध्ये सरसकट दोन लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना (Farmer) कर्जमाफी दिली होती. आता पाहिले असता कर्जाचा बोजा खूप वाढला आहे. सरसकट चार लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी होती. नियमित कर्ज भरणाऱ्यांना एक लाख रुपयापर्यंत सूट देणे आवश्यक होतं."
'ही कर्जमाफी अतिशय तुटपुंजी अशी ठरलेली आहे. काळ बदललेला आहे. चार-पाच वर्षानंतर कर्जमाफी करत आहोत. कर्जमाफीला अनेक वर्ष गेलेले आहेत. आम्ही त्यावेळेस दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली होती, ती काळानुसार योग्य होती. पण आता जी दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली आहे, ते प्रमाण काही योग्य नाही', असे निरीक्षण थोरात (Balasaheb Thorat) यांनी नोंदवलं.
'आखातामध्ये जे युद्ध सुरू आहे, त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर विशेष करून फळ उत्पादक शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. या शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतला आहे, याची उत्सुकता आम्हाला आहे,' असेही थोरात यांनी म्हटले.
'अतिवृष्टी झालेल्या काळातील शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांच्या अक्षरशः जमिनी खरडून गेल्या होत्या. शेतकऱ्यांना उभा करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण दुर्दैवाने सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. जे काही दिले जात आहे ते अतिशय तुटपुंज आहे. दोन लाख रुपयापर्यंत जी कर्जमाफी दिली जात आहे, याला काही अर्थ नाही, शेतकऱ्यांना सरसकट, अशी कर्जमाफी हवी होती,' याचा पुनरूच्चार थोरात यांनी केला.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून त्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करणं आवश्यक होतं. त्या दृष्टीने सरकारने विचार करायला हवा होता. तो इथं झालेला नाही, असंही निरीक्षणही थोरात यांनी नोंदवलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.