

Ahilyanagar religious site controversy : तीन ते चार वर्षांपासून गुहा (ता. राहुरी) इथल्या धार्मिक स्थळावरून हिंदू-मुस्लिम समाजाचा वाद सुरू आहे. दोन्ही समाज समोरा-समोर येऊन गावात दंगल झाली. हा वाद पुढे वक्फ न्यायाधिकरणात पोहोचला.
यंदा होळीनिमित्तानं यात्राचं नियोजन होत असतानाच, छत्रपती संभाजीनगरमधील महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण औरंगाबादचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अदिल खान आणि वक्फ न्यायाधिकरणाचे सदस्य तथा मुस्लिम कायदा व न्यायशास्त्राचे मोहिउद्दीन मोईद यांनी यात मोठा निर्णय दिला. हा आदेश येताच, सकल हिंदू समाजाने, समाज माध्यमांवर, 'आता नाही, तर कधी नाही', अशी पोस्ट व्हायरल करत, उद्या सात मार्चला कावड यात्रेसाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं. यामुळे गुहामधील धार्मिक स्थळावरून पुन्हा हिंदू-मुस्लिम वाद उफाळणार असल्याची शक्यता आहे.
औरंगाबाद इथल्या महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणात (Waqf Board) गुहा इथल्या कान्होबा देव उर्फ हजरत बाबा रमजान दर्गा वक्फ यांच्या विश्वस्तांनी गुहा ग्रामपंचायतीला प्रतिवाद करत सूट दाखल केलं. वक्फ न्यायाधिकरणाने नऊ मार्च 2023 मध्ये धार्मिक स्थळावर कोणताही धार्मिक कार्यक्रम घेण्यास मनाईचा आदेश दिला. परंतु तिथं धार्मिक कार्यक्रमाचा प्रयत्न झाल्याचे लक्ष वेधण्यात आलं.
आता पुन्हा होळीनिमित्तानं धार्मिक यात्रेचं आयोजन करण्यात येत असल्याचं फिर्यादीनं वक्फ न्यायाधिकरणाच्या निदर्शनास आणून दिलं. याबाबत स्थानिक प्रशासनाचं लक्ष घालावं, अशी मागणी केली. तसंच वक्फ न्यायाधिकरणाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस (Police) संरक्षण देण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी फिर्यादीनं केली.
या सुनावणीवेळी वक्फ न्यायाधिकरणासमोर, गुहा ग्रामपंचायतीचे प्रतिवादी नव्हते. वक्फ न्यायाधिकरणाने धार्मिक स्थळाच्या गट क्रमांक 23मध्ये कोणतेही धार्मिक कार्यक्रम घेण्यास मनाईचा आदेश काढला. वादग्रस्त रचना सुरक्षित राहावी आणि समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी, या उद्देशाने दोन्ही पक्षांना धार्मिक कार्यक्रम करण्यास मनाईचा आदेश काढला.
अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना वक्फ न्यायाधिकरणाने, गुहा इथल्या धार्मिक स्थळाच्या गट 23 मधील वादग्रस्त जागेचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक तेवढे पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा, असे आदेशात सांगत दोन्ही बाजूने कोणताही धार्मिक कार्यक्रम घेऊ नये, असे स्पष्ट केलं. तसंच आदेशाची अंमलबजावणी करून, त्याचा अहवाल दहा दिवसात सादर करावा, असेही आदेशात पुढं म्हटलं आहे.
वक्फ न्यायाधिकरणाच्या या आदेशानंतर, सकल हिंदू समाजाच्यावतीने समाज माध्यमांवर पोस्ट व्हायरल करत, एकत्र येण्याचं आवाहन केलं. मुस्लिमांना देखील गट क्रमांक 23 मध्ये पोलिसांनी जाऊ देऊ नये. तसंच कावड मिरवणुकीचे उद्या (ता. 7) आणि रविवारी (ता. 8) एकत्र यावे. हे मंदिर आपले असून, ते कायमचे बंद होईल. ही लढाई म्हणजे हिंदूंच्या अस्तित्त्वाची लढाई आहे, अन् माघार घ्यायची नाही, असे व्हायरल करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
वक्फ न्यायाधिकरणाचा आदेश अन् सकल हिंदू समाजाने व्हायरल केलेल्या पोस्टमुळे गुहा (ता. राहुरी) इथल्या धार्मिक स्थळावरून पुढील काही तासांत वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुस्लिमांनी प्रशासनाकडे बोट दाखवत, वक्त न्यायाधिकरणाच्या आदेशाचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. यात प्रशासन आता नेमकी कोणती भूमिका घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.