Shirdi Lok Sabha elections : भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पुत्रासाठी 'नगर दक्षिणे'त गुंतून पडले. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी लोकसभा मतदारंसघात सदाशिव लोखंडेसाठी उतरले. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरातांनी फिरवलेल्या वाऱ्यामुळं लोखंडे यांचा पराभव झाला. यात मंत्री विखे यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातून लोखंडे यांचे तब्बल 50 हजारांचे मताधिक्य घटले. महायुतीच्या उमेदवाराचं घटलेले मतदान मंत्री विखेंसाठी देखील धोका असल्याचे संकेत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सदाशिव लोखंडे यांच्या विजयासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. साखर कारखानदार, महंत, मठाधिपती यांची बैठक घेऊन लोखंडे यांच्या विजयासाठी बरचं साकडे घातले. तरी देखील मुख्यमंत्री शिंदे यांची ही राजकीय डिप्लोमसी लोखंडे यांचा पराभव रोखू शकली नाही. तसेच मंत्री दादा भुसे यांना देखील मतदारसंघात उतरण्यात आले होते. त्यांच्यावर पडद्यामागे महत्त्वाची भूमिका होती. मंत्री भुसे यांचे सर्व डावपेच फेल गेले आणि लोखंडे यांचा पराभव अगदी गडद झाला.
या निवडणुकीत कारखानदारांची भूमिका महत्त्वाची होती. त्याची मोट बांधण्यात मुख्मयंत्री यशस्वी ठरले होते. भाजप (BJP) नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार भानुदास मुरकुटे या कारखानदारांची ताकद लोखंडे यांच्याबाजूने उतरवण्यात आली होती. तरी देखील लोखंडे विजयाचे गणित फिस्कटले. तसेच शिवसेनेचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या नेवासा विधानसभा मतदारसंघातून लोखंडे यांना मताधिक्य मिळाले आहे. तरी देखील विजय जुळवून आला नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याबाजूने विजयाचे वारे फिरवले. शिर्डी लोकसभा मतदारसंघात मंत्री राधाकृष्ण विखे आणि थोरात यांचे होमग्राऊंड आहे. या दोघांमधील राजकारणाचा परिणाम या मतदारसंघात होत असतो. पडसाद उमटतात. मात्र मंत्री विखे पुत्र सुजय विखे यांच्या विजयासाठी 'नगर दक्षिणे'त अडकून पडले. थोरातांनी हेच हेरले आणि संगमनेरसह अकोले तालुक्यातून भाऊसाहेब वाकचौरे यांचे विजयाचे गणित जुळवून आणले.
भाऊसाहेब वाकचौरे यांना अकोले तालुक्यातून तब्बल 54 हजारांचे मताधिक्य मिळाले. याशिवाय राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा विधानसभा मतदारसंघात लोखंडे यांना मिळालेली 34 हजार मतांची आघाडी अकोले तालुक्यातनं भरून काढली. संगमनेरमधील मताधिक्याने त्यावर विजयाचा शिक्कामोर्तब केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.