Nashik Centre News: राज्यातील विधानसभा जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीचे नेते अतिशय सावध पावले टाकत आहेत. यामध्ये भाजपच्या डावपेचंना उत्तर देण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे जागावाटप सातत्याने पुढे ढकलले जात आहे. त्यात आता काही जागांवरून ओढाताण होण्याची चिन्हे आहेत.
विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरात तीन मतदारसंघ आहेत. या मतदारसंघाची राजकीय पार्श्वभूमी आणि पक्षांची संघटनात्मक शक्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. सध्या या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत.
भाजपच्या विद्यमान आमदारांच्या विरोधात कोणी उमेदवार द्यावे, यावर वरिष्ठ नेते सातत्याने स्थानिक नेत्यांच्या संपर्कात आहेत. स्थानिक इच्छुकांनी देखील जोरदार लॉबिंग करण्याचा प्रयत्न केला आहे.
या सगळ्यात जागा वाटपाचे राजकीय सूत्र कोणते? याची सगळ्यांना उत्सुकता आहे. सामान्यत: नाशिक पूर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तर पश्चिम मतदार संघ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला असे सध्याचे चित्र आहे.
नाशिक मध्य हा मतदारसंघ काँग्रेस की शिवसेनेला हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ मानला जातो. मात्र काँग्रेसला गेल्या तीन निवडणुकांमध्ये येथे प्रभाव टाकता आलेला नाही. प्रारंभी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत गिते आणि त्यानंतर दोन टर्म भाजपच्या प्रा. देवयानी फरांदे येथे आमदार आहेत.
या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने माजी महापौर वसंत गीते यांना उमेदवारी देण्याचा ठराव केला आहे. श्री गीते यांनी प्रचार देखील सुरू केला आहे. विविध सामाजिक घटकांशी त्यांचा संपर्क आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी देखील येथे नुकताच मेळावा घेऊन सहकारी पक्षांना संदेश दिला.
त्याच वेळी आता या मतदारसंघावर काँग्रेसने आपला दावा ठोकला आहे. त्यामुळे या मतदारसंघासाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. त्याबाबत स्थानिक नेते देखील झोकून देऊन कामाला लागले आहेत.
या मतदारसंघात अल्पसंख्यांक मतदार निकालावर प्रभाव टाकू शकतील एवढ्या संख्येने आहेत. याशिवाय मनोज जरांगे पाटील फॅक्टर हा भारतीय जनता पक्षाच्या परंपरागत मतदारांना धक्का देण्याच्या स्थितीत आहे. ही स्थिती भाजपला धोक्याची घंटा आहे.
भाजप आणि विद्यमान आमदार फरांदे अतिशय जाणीवपूर्वक निवडणुकीची बांधणी करण्यात व्यस्त आहेत. त्यात मतदारसंघ कोणाला यावरून महाविकास आघाडीत मात्र चांगलीच आदळ आपट होण्याची चिन्हे आहेत.
या मतदारसंघात काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी मतदार नोंदणी पासून काम केले आहे. डॉ हेमलता पाटील, हनीफ बशीर, प्रा भालचंद्र पाटील यांचा विविध इच्छुकांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे.
विशेष म्हणजे शहरात पक्षाची संघटनात्मक ताकद आणि विस्तार करण्यासाठी काँग्रेसला हा मतदारसंघ आपल्याकडे राखणे आवश्यक वाटते. महाविकास आघाडीचा आगामी काळात राजकीय प्रभाव वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी मध्य, पूर्व आणि पश्चिम या तिन्ही मतदारसंघात प्रत्येक पक्षाला जागा मिळावा असे घटक पक्षांना वाटते. त्यामुळे पूर्व राष्ट्रवादी काँग्रेसला, पश्चिम शिवसेना ठाकरे गटाला आणि मध्य काँग्रेसला असा समतोल साधला जाऊ शकतो.
काँग्रेसला जागा न मिळाल्यास शहरात आगामी निवडणुकांसाठी अडचणी येऊ शकतात अशी स्थिती आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांना हे गणित पटवून देण्यात स्थानिक पदाधिकारी यशस्वी झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही स्थितीत हा मतदारसंघ प्रदेशाध्यक्ष पटोले आणि श्री थोरात यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.