Nilesh Lanke 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke : 15 दिवसात 'LCB'चे कारनामे बाहेर येणार; लंकेच्या आंदोलनावर रश्मी शुक्लांचे चौकशीचा आदेश

Pradeep Pendhare

Ahmednagar News : अहमदनगर पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्ट कारभाराच्या चौकशीसाठी खासदार नीलेश लंके यांनी केलेल्या मागण्यांवर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सकारात्मक भूमिका घेतली. खासदार लंके यांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमून 15 दिवसांत अहवाल देण्याचे लेखी आश्‍वासन दिले.

यानंतर खासदार लंके यांनी यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील बेमुदत उपोषण आज चौथ्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित मागे घेतले. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन आंदोलन थांबवत असून, पोलिस महासंचालकांच्या आश्वासनामुळे पाठपुरावा सुरूच राहील, असा इशारा खासदार लंके यांनी दिला. दरम्यान, खासदार लंके दिल्लीला अधिवेशनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले.

खासदार लंके यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर नगरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी शिष्टमंडळाने तीन वेळा चर्चा केली. मात्र ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आंदोलनात तोडगा निघाला नव्हता. विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांच्याकडूनही ठोस आश्‍वासन देण्यात येत नसल्याने तिसऱ्या दिवशीपर्यंत या आंदोलनाची कोंडी फुटली नव्हती. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आज उपोषणस्थळी येत खासदार नीलेश लंके यांच्याशी चर्चा केली.

लंके यांच्याशी चर्चेनंतर थोरात यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांच्याशी चर्चा केली. मात्र लंके आपल्या मागण्यांवर ठाम राहून त्यांना कालबध्द आश्‍वासन हवे होते. त्यामुळे थोरात यांनी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. शुक्ला आणि थोरात यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन आंदोलन सुटण्याचा मार्ग मोकळा झाला.

बाळासाहेब थोरात आणि रश्मी शुक्ला यांच्यात झालेल्या चर्चेनुसार खासदार लंके यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्या. यासंदर्भात विशेष पोलिस (Police) महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांच्याशी शुक्ला यांची झालेल्या चर्चेनुसार लंके यांना कराळे यांनी लेखी आश्‍वासन दिले. पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून कराळे यांचे पत्र लंके यांना मिळाल्यानंतर लंके यांच्यासह त्यांच्यासोबत उपोषणास बसलेले माजी नगरसेवक योगीराज गाडे, बबलू रोहोकले आणि बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते लिंबू पाणी देण्यात येऊन आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रमुख मागणीनुसार चौकशी सुरू

खासदार नीलेश लंके यांनी केलेल्या चौकशीची मागणी मान्य करण्यात आली असून त्यासाठी नाशिक ग्रामीणच्या अप्पर पोलिस अधीक्षकांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी 15 दिवसांत तक्रारींची चौकशी करून अहवाल सादर करतील. ही चौकशी आवश्यकता असेल, तर इन कॅमेरा करण्यात येईल. 15 दिवसांत अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आले आहे.

खासदार लंके दिल्लीला रवाना

आंदोलन यशस्वी झाल्यानंतर दिल्लीमध्ये सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी खासदार नीलेश लंके गुरूवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. आंदोलनामुळे थकवा आलेला असतानाही सर्वसामान्यांच्या प्रश्‍नासाठी मला दिल्लीला जाणे भाग असल्याचे लंके यांनी सांगितले. या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले. जिल्हाभरातील सर्वसामान्य नागरीकांनीही या आंदोलनास पाठबळ दिल्याने आंदोलन यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया खासदार लंके यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT