Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात सुरू केलेल्या बेमुदत उपोषणावर खासदार नीलेश लंके चौथ्या दिवशी ठाम आहेत. त्यांची प्रकृती ढासळली असली, तरी ठोस निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्यावर ठाम आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आंदोलनस्थळी येत नीलेश लंके यांच्याशी संवाद साधला. आंदोलनाला पाठिंबा दिला. तत्पूर्वी नीलेश लंके यांनी पोलिसांचे रेटकार्ड जाहीर केले. हे रेटकार्ड त्यांच्या एक्स खात्यावर देखील शेअर केले आहे. यामुळे अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या कार्यपद्धतीचे धिंडवडे निघालेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांचे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या भ्रष्ट कारभाविरोधात बेमुदत उपोषण सुरू आहे. या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. या आंदोलनावेळी त्यांनी अहमदनगर जिल्हा पोलिस दलाचे स्थानिक गुन्हे शाखा पोलिस नगर जिल्ह्यातून दरमहा 27 कोटी 60 लाख रुपयांचा हप्ते वसूल करत असल्याची धक्कादायक माहिती खासदार नीलेश लंके यांनी जाहीर केली. अहमदनगर जिल्हा पोलिस दलाचे हे एक प्रकारे रेटकार्ड असल्याचे नीलेश लंके यांनी म्हटले.
खासदार लंके म्हणाले, "पोलिस (Police) दलातील 2 टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलिस दल बदनाम होत आहे. समाज भयभीत झालेला आहे. अवैध धंद्यांना कोण पाठीशी घालते? खुनाचा तपास का लागत नाही?" स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर चुकीच्या कर्मचाऱ्यांची ऑर्डर आपल्या विभागात करून घेतात. सायबर विभागात बदली असलेले कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेत काम करतात. याच विभागाची प्रोत्साहनपर बक्षिसे घेतात. आजच याच विभागाच्या संदीप चव्हाण नावाच्या कर्मचाऱ्याविरोधात लाचलुचपत विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला. तरीही पोलिस प्रशासनास पुरावे हवेत का? असा सवाल खासदार लंके यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी खासदार लंके यांच्या उपोषणास तीन दिवस झाले, तरी पोलिस अधीक्षक भेटीसाठी का येत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला. भ्रष्टाचाराला पाठिशी घालण्याचे काम वरीष्ठ अधिकारी करत आहेत का? सकारात्मक चर्चा होत असताना वरीष्ठ अधिकारी मात्र वेगळाचा प्रस्ताव देतात. याचा अर्थ या भ्रष्टाचारास राज्याच्या गृह खात्याचे पाठबळ आहे, असा संदेश राज्यात जाईल. या आंदोलनाकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यपातळीवर आंदोलन नेले जाईल, असा राजेंद्र इशारा फाळके यांनी दिला. आता पोलिस अधीक्षकांशी आम्ही चर्चा करणार नाही. आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करू असेही फाळके म्हणाले.
चंदन तस्करी आणि रेशनिंग 40 लाख, गुटखा 1 कोटी 53 लाख, नगर शहर कॅफे 50 लाख, वाळू ट्रॅक्टर 2 कोटी 50 लाख, वाळू गाडी 4 कोटी 80 लाख, जेसीबी 1 कोटी 40 लाख, पोकलेन 50 लाख, आयपीएल सट्टा 50 लाख, वेश्या व्यवसाय हॉटेल 30 लाख, इतर अवैध व्यवसाय 55 लाख, मटका 7 कोटी 55 लाख, बिंगो 1 कोटी 40 लाख, मावा 3 कोटी 30 लाख, दारू हॉटेल 75 लाख, डिझेल आणि पेट्रोल तस्करी 12 लाख 50 हजार, ट्रक आणि रिक्षा 10 लाख आणि जुगार 75 लाख.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.