Maharashtra leopard problem : बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बिबट नसबंदी धोरण तात्पुरते न राबवता राज्यातील सर्व हॉटस्पॉट भागांमध्ये युद्धपातळीवर आणि वेगाने राबवावे, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली.
संगमनेर तालुक्यातील वनक्षेत्र, पर्यटन आणि भटक्या जनावरांच्या समस्यांसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर तांबे यांनी नाईक यांची भेट घेऊन चर्चा केली.
अहिल्यानगर (Ahilyanagar), नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये लहान मुले, शेतकरी आणि महिलांना जीव गमवावा लागला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात जानेवारी 2025 ते जुलै 2026 या कालावधीत बिबट्यांच्या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तांबे यांनी दिली. या काळात वन विभागाने पिंजरे लावून 35 बिबट्यांना पकडले आहे. मात्र, बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे मानवी वस्त्यांसोबतच शेतकऱ्यांच्या पशुधनालाही धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे बिबट नसबंदीचे धोरण केवळ तात्पुरत्या स्वरूपात न राबवता बिबट्यांचे हॉटस्पॉट ठरलेल्या सर्व भागांमध्ये युद्धपातळीवर आणि गतीने अंमलात आणावे, अशी मागणी तांबे यांनी केली. या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिल्याचे सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यात ग्रामीण तसेच शहरी भागात भटक्या जनावरांची संख्या मोठी आहे. अपघात, जखम, आजारपण, साथीचे रोग तसेच अन्न-पाण्याचा अभाव यामुळे या जनावरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा जखमी आणि आजारी जनावरांवर उपचार करण्यासाठी वन विभागाची एक एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तांबे यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील मौजे कऱ्हे येथील प्राचीन संकटमोचक हनुमान मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे होणारे उत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता 3/2 प्रस्तावांतर्गत विशेष बाब म्हणून अतिरिक्त जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही तांबे यांनी वनमंत्र्यांकडे केली.
चंदनापुरी घाट परिसरातील तामकडा धबधबा पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे. दरवर्षी येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता संरक्षण कठडे, वाहनतळ, विश्रांती व्यवस्था, स्वच्छतागृहे, माहिती केंद्र आणि पर्यावरण संरक्षणाच्या उपाययोजना उभारण्याची गरज असल्याचे तांबे यांनी सांगितले.
यासाठी वन विभागाकडून 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली. बिबट नसबंदी, जखमी जनावरांसाठी जागा, कऱ्हे येथील मंदिरासाठी अतिरिक्त जागा आणि तामकडा धबधब्याच्या विकासासह या सर्व मागण्यांवर वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.