Dr. Sujay Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MP Sujay Vikhe News : सुजय विखेंच्या उमेदवारीबरोबरच नगर जिल्ह्यात विरोधी उमेदवाराबाबत चर्चांना उधाण!

Loksabha Election 2024 : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून, महाराष्ट्रातील 20 जणांची नावे यादीत आहेत.

Pradeep Pendhare

Ahmednagar Loksabha Constituency : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय समितीने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. खासदार विखेंचे नाव यादीत येताच, 'एकदाचे झाले फायनल'!, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत असून, आता विरोधात कोण? याची चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यात सुरू झाली आहे.

याशिवाय महाविकास आघाडीकडून कोण? याची चर्चादेखील नगरमध्ये रंगली आहे. यातच आमदार नीलेश लंके यांच्या नावाच्या चर्चेने जोर धरला होता. खासदार विखे यांनी उमेदवारी जाहीर होताच यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. 'समोर कोणीही असले, तरी आमचा मुद्दा विकासाचा आहे. तोच घेऊन आम्ही जनतेत जाणार आहोत', असे खासदार विखे यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे आहे. भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे हे स्वतः उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. भाजप आमदार प्रा. राम शिंदे आणि प्रदेश सदस्य प्रा. भानुदास बेरड यांनी उमेदवारीसाठी जोर लावला होता. भाजपच्या केंद्रीय समितीच्या निरीक्षकांसमोर हे तिघे मुलाखतींना समोरे गेले होते.

तसेच भाजपअंतर्गत सर्व्हेनुसार नगर दक्षिणची जागा रेड झोन दाखवत असल्याने येथे खांदेपालटीची चर्चा होती. या सर्व चर्चांमुळे खासदार सुजय विखे(Sujay Vikhe) अस्वस्थ होते. तसेच उमेदवारीवरदेखील भाष्य टाळत होते. भाजप जो उमेदवार देईल, त्याचे काम करून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करू, असेच उत्तर खासदार विखे देत होते.

खासदार विखेंच्या या सावध विधानांमुळे त्यांच्या उमेदवारीबाबत माध्यमांमध्ये सांशकता निर्माण झाली होती. यातच काही दिवसांपासून खासदार विखे हे माध्यमांपासून अलिप्त राहत होते. तसेच माध्यमांना सामोरे गेल्यास ते सावध प्रतिक्रिया द्यायचे. याचवेळी ते उमेदवारीसाठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावत असल्याची चर्चा होती. यासाठी त्यांचे वडील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे निर्णायक भूमिकेत होते.

मंत्री विखे हे भाजपच्या(BJP) केंद्रीय नेत्यांच्या सातत्याने संपर्कात होते, तर दुसरीकडे खासदार विखेंनी नगर दक्षिणमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे विधानसभा मतदारसंघनिहाय धडाका लावला होता. या कार्यक्रमांद्वारे खासदार विखे हे सध्या तरी प्रचारात पुढे आहेत. असे असले तरी खासदार विखेंविरोधात महाविकास आघाडी कोणता उमेदवार देणार, याची चर्चा नगरमध्ये जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे ही चर्चा भाजपच्या गोठ्यात जास्त आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT