Sharad Pawar Political News: 'नगर दक्षिण'मध्ये शरद पवार फासे पलटवणार; अजितदादांच्या शिलेदारालाच...

Ahmednagar Loksabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पुणे येथील कार्यालयात उद्या गुरुवारी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाविषयी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
NCP Sharad Pawar Political News
NCP Sharad Pawar Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : शरद पवार यांच्यासाठी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके हे तुतारी घेणार असल्याची राजकीय चर्चा जोरात असतानाच ते एकमेकांना चकवा देत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पुणे येथील कार्यालयात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाविषयी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. यात उमेदवार निश्चितीबरोबच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघाविषयी महत्त्वपूर्ण खलबते होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत शरद पवार नगर दक्षिण उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करणार असून, त्यात आमदार लंकेंचे नाव असल्याची चर्चा रंगली आहे.

नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार अजून निश्चित झालेले नाही. दोन्ही बाजूने राज्यातील उमेदवारांची नावे निश्चित नाहीत. बैठकांवर बैठका सुरू आहेत. पुढील दोन दिवसांत उमेदवार निश्चित होतील, असे सांगून आघाडी आणि युती वेळ मारून नेत एकमेकांविरोधात चाचपणी करत आहेत.

महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेले. महाविकास आघाडीतील प्रमुख काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे, परंतु नावे निश्चित करण्याचे धारिष्ठ अजून तरी कोणी दाखवलेले नाही.

NCP Sharad Pawar Political News
Manoj Jarange Patil News : फडणवीस लोकसभेला कसे 'गुलाल उधळतात' ते बघतोच... ; जरांगेंचं चॅलेंज!

नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ आघाडी आणि युतीकडून चर्चेत आणि महत्त्वपूर्ण आहेत. लोकसभेच्या निवडणुकीवर पुढील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुकीचेदेखील गणिते जुळवली जात आहेत. यासाठी लोकसभेला उमेदवार देताना ताकदीचा द्यावा लागणार आहे, हे आघाडी आणि युतीकडील नेत्यांना माहिती आहे. नगर दक्षिणची जागा भारतीय जनता पक्षाकडे आहे. विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांचे नाव निश्चित जरी असले, तरी भाजपकडून आमदार प्रा. राम शिंदे आणि प्रदेश सदस्य प्रा. भानुदास बेरड यांची नावेदेखील चर्चेत आहेत.

भाजपकडून या तिघांची नावे तरी चर्चेत आहेत. मात्र, महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारीचा चेहरा अजून तरी समोर आलेला नाही. शरदचंद्र पवार पक्षाकडून जेव्हा-जेव्हा नगर दक्षिणचा आढावा घेतला जातो, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांचे नाव चर्चेत येते. तशी चर्चादेखील घडवून आणण्यात आमदार लंके हे आतापर्यंत तरी यशस्वी ठरले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांना शरदचंद्र पवार पक्षात येण्याचे निमंत्रण वारंवार देण्यात आले आहे. शरद पवार यांनी आमदार लंकेंची चर्चा फेटाळली असली तरी, आमदार लंके यांनी राजकारणात कोणत्याही क्षणी कोणता टर्न येईल, हे सांगता येत नाही. तसेच राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून जायचे आहेत, असे संकेत देत लोकसभेसाठी नाव चर्चेत ठेवले आहेत. तसेच शरद पवार यांच्या राजकारणाचा तळ कधीच सापडत नाही, असे सांगितले जाते. नगर दक्षिणबाबत उमेदवारी देताना त्याची अनुभूती येत आहे. असे असले, तरी शरद पवार आता आमदार लंके यांच्याविषयीच्या चर्चा फेटाळून लावत असले, तरी ते त्याच्या उलट करतील, असे भाकीत वर्तवले जात आहे. त्यामुळे आमदार लंकेंच्या संभाव्य प्रवेशाला आणि उमेदवारीला त्यांचे आशीर्वाद नक्कीच असतील, अशीदेखील चर्चा आहे.

नगर दक्षिणच्या जागेबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्या (गुरुवारी) पुणे येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीचे निमंत्रक जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे आहेत. माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आमदार दादा कळमकर, पक्षाचे प्रभारी आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, प्रतापराव ढाकणे, माजी आमदार राहुल जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर या प्रमुखांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीत नगर दक्षिणच्या उमेदवारावर अंतिम निर्णय होणार आहे. या निर्णयानंतर शरद पवारच उमेदवाराचे नाव जाहीर करतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे उद्या पुणे येथे होत असलेल्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

NCP Sharad Pawar Political News
Modi Guarantee : पंतप्रधान मोदींचा 'तो' शब्द काँग्रेससाठी पण ठरतोय 'गॅरंटी'चा

विखे विरोधकांकडून आमदार लंकेच्या खांद्याचा वापर!

नगर दक्षिणेचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे व त्यांचे वडील पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात नगर जिल्हा भाजपमध्ये खदखद आहे. तशी ती उघडदेखील झाली आहे. दिल्ली दरबारी विखे पिता-पुत्रांचे वजनदेखील वाढले आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपमध्ये आल्यावर विधानसभा निवडणुकीत 12-0 अशी घोषणा विखेंनी केली होती. पण पक्षाचे पाच उमेदवार पराभूत झाले. यामुळे विखेंविरोधात स्थानिक पातळीवर नाराजी वाढली आहे. त्यामुळे आता लोकसभेनंतरच्या विधानसभा निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती होण्याची भीती स्थानिक भाजप नेत्यांमध्ये आहे.

या पार्श्वभूमीवर, भाजपचे जिल्ह्यातील नेते आमदार राम शिंदे यांनीही आमदार नीलेश लंकेंना मनोकामना पूर्ण होण्याच्या शुभेच्छा जाहीरपणे दिल्या आहेत. शिवाय, ते स्वतःही लोकसभेसाठी इच्छुक आहेत. संघ परिवार आणि भाजपशी एकनिष्ठ असलेले भाजप नेते प्रा. भानुदास बेरड यांनीदेखील किती दिवस पक्षात सतरंज्या उचलायच्या, अशी भूमिका घेत प्रदेश आणि केंद्रीय नेतृत्वाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. यातून पक्षांतर्गत सुरू असलेल्या शह-काटशहाच्या खेळीला राज्य भाजपमधून तर फूस नाही ना, अशीदेखील चर्चा आहे. मुंबईतून मिळालेल्या ताकदीच्या जोरावर थेट नाही, पण आमदार लंकेंच्या म्हणजे महायुतीच्या माध्यमातून पक्षांतर्गत अस्वस्थतेला हवा देण्याचा प्रकार जोरात सुरू आहे

यात, विखे आणि लंकेंमधील वादही जगजाहीर आहेत. केके रेंज भूसंपादन विषयाचे श्रेय घेण्यावरून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील आमदार लंके आणि खासदार विखे यांच्यात जाहीर कलगीतुराही रंगला होता. त्यातून आलेली कटूता अजूनही कायम आहे. त्यावेळीच मविआचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून आ. लंकेंचे नाव चर्चेत होते. आता ते महायुतीत असले तरी अजूनही त्यांचे नाव चर्चेत राहणे म्हणजे भाजपअंतर्गत विखे विरोधाची धुसफूस आमदार लंकेंच्या खांद्याचा वापर तर करीत नाही ना, अशी शंका राष्ट्रवादी काॅंग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या भाष्यातून व्यक्त केली आहे.

R

NCP Sharad Pawar Political News
Vasant More News : वसंत मोरेंना काँग्रेसची ऑफर; मोहन जोशींनी घेतली भेट...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com