BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Deolali Constituency News : देवळाली मतदारसंघासाठी भाजपाने एक नव्हे तर तीन इच्छुकांना लावले कामाला!

Sampat Devgire

BJP Pritam Adhav News : भाजपाने देवळाली मतदारसंघात एक दोन नव्हे तर चक्क तीन इच्छुकांना पक्षाच्या प्रचारासाठी कामाला लावले आहे आणि त्या अक्षरश: खोक्यांची उधळण करीत प्रचार करताना दिसत आहे. प्रत्यक्षात येथील आमदार अजित पवार गटाचा आहे. त्यामुळे भाजपा नाशिक पूर्व मतदार संघात राबविलेले आपले स्टेटस देवळाली मतदारसंघात तर वापरत नाही ना, अशी चर्चा आहे.

याला निमित्त ठरला देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा आणि विधानसभेच्या इच्छुक उमेदवार प्रीतम आढाव यांनी आयोजित केलेला जंगी हळदी कुंकवाचा कार्यक्रम. या कार्यक्रमाची त्यांनी दोन महिने तयारी केली होती. या कार्यक्रमाला मतदार संघातील विविध गावातून तब्बल तीन हजारांहून अधिक महिला एकत्र आल्या होत्या.

विविध कार्यक्रम आणि स्पर्धा झाल्या. त्यात बाईक, सोन्याचे दागिने, कुलर, घरगुती वापराच्या विविध वस्तू अशा लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट झाली. एवढ्या महिला एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेला देखील उपस्थित नसतात. त्यामुळे हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देवळाली मतदारसंघात 1985 च्या निवडणुकीत 'पुलोद' आघाडीत भिकचंद हरिभाऊ दोंदे हे भाजपाचे शेवटचे आमदार होते 1990 पासून 2009 पर्यंत येथे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) माजीमंत्री बबन घोलप(Baban Gholap) हे निवडून आलेले आहेत. 2014 च्या निवडणुकीत तांत्रिक कारणामुळे घोलप उमेदवारी दाखल करू शकले नाही. त्यामुळे त्यांचे चिरंजीव योगेश घोलप आमदार झाले होते. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे विजयी झाल्या.

या मतदारसंघाचा इतिहास पाहता 2019 चा देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा अपवाद वगळता विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, ग्रामपंचायत कुठेही भाजपाला स्थान नाही असे चित्र आहे. असे असताना अचानक भाजपाच्या तीन इच्छुक महिला येथे जोरकस तयारी करीत आहेत या तयारीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजपाच्या प्रीतम आढाव यांच्या कार्यक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद हा सध्या भाजपा आघाडीच्या घटक असलेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदार अहिरे यांना धोक्याची घंटा आहे. या कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाने अहिरे यांच्या उरात नक्कीच धडकी भरली असणार. या मतदारसंघात सध्या भाजपाच्या राजश्री अहिरराव यांनी तहसीलदार पदाचा राजीनामा देऊन भाजपा तर्फे निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष प्रीतम आढाव या गेले पाच वर्षे तयारी करीत आहेत. आमदार घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप-भोईर देखील आमदारकीसाठी इच्छुक असून त्या विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुखही आहेत. या तिन्ही महिला उमेदवारांना भाजपाच्या तीन वेगवेगळ्या वरिष्ठ नेत्यांनी 'कामाला लागा' असा संदेश दिला आहे. सर्व राजकारणाची मेख याच संदेशात आहे.

या संदर्भात भाजपाने(bjp) 2019 मध्ये नाशिक पूर्व मतदार संघात राबविलेली राजकीय खेळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 2019मध्ये नाशिक पूर्व मतदारसंघात विद्यमान आमदार बाळासाहेब सानप हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय होते. त्यांना प्रचाराला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचवेळी कामगार नेते जगदीश गोडसे यांनाही एका नेत्याने शब्द दिल्याची चर्चा होती. तिसरे उमेदवार उद्धव निमसे हे उमेदवारीसाठी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात आले होते.

या तिन्ही उमेदवारांनी उमेदवारीच्या अपेक्षेने मतदारसंघात घरोघरी जाऊन भाजपचा प्रचार केला. प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र विद्यमान आमदार सानप यांना देखील डावलण्यात आले. राहुल ढिकले या नव्या उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिली.

इच्छुक म्हणून निवडणुकीआधी तिघे भाजपाचा प्रचार करीत होते. त्याचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत झाला. मात्र तिन्ही इच्छुकांना प्रत्यक्ष निवडणुकीत कोपऱ्यात बसून गंमत पाहावी लागली होती. हीच स्ट्रॅटेजी देवळाली मतदारसंघात तर रिपीट होत नाही ना? अशी शंका राजकीय कार्यकर्त्यांमध्ये आहे. मूळ मतदारसंघ शिवसेनेचा, विद्यमान आमदार अजित पवार(Ajit Pawar) गटाच्या सरोज अहिरे आणि प्रचार करीत आहेत भाजपच्या तीन इच्छुक महिला. या राजकीय स्पर्धेत खरा उमेदवार कोण असेल? याबाबत जोरात चर्चा होत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT