Girish Mahajan, Eknath Khadse & Gulabrao Patil
Girish Mahajan, Eknath Khadse & Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Khandesh Politics; भाजपला अजूनही एकनाथ खडसे यांची भीती वाटते?

Sampat Devgire

डॉ. राहुल रनाळकर

जळगाव : (Jalgaon) राजकीय (Politics) क्षेत्र सध्या चांगलेच ढवळून निघत आहे. खानदेश त्याला अपवाद कसा असेल? शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर खानदेशमध्ये भाजप (BJP) अधिक आक्रमक रणनीती आखताना दिसून येत आहे. भाजपला अजूनही एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची भीती वाटत असावी. वेगवेगळ्या प्रकरणांच्या माध्यमातून खडसेंना घेरण्याचा प्रयत्न सातत्यानं होताना दिसून येतो. (BJP tries to corner Eknath Khadse through various tacties)

गौण खनिज प्रकरणात खडसेंसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गिरीश महाजन हे आता खानदेशचे नेते म्हणून प्रस्थापित होण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. धुळ्यामध्ये शिवजयंतीच्या वादानंतर अतिक्रमणांचा मुद्दा सर्वाधिक चर्चेत आहे. तर नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित यांचे संपूर्ण कुटुंब सत्तेचे केंद्र बनलेले आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर खानदेशात शिंदे गटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जळगावातील ठाकरे समर्थकांमध्ये अनेकदा खडाजंगी होताना दिसून येते. धुळ्यातही बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते शिंदे गटात आहेत. नंदुरबारमध्ये शिंदे गट अजूनही चाचपडत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिंदे गट आणि ठाकरे गट हे चारही राजकीय पक्ष भाजपच्या तुलनेने प्रचंड कमकुवत झाले आहेत. पर्यायानं भाजपसाठी पूर्ण क्षमतेने पाय रोवण्यासाठी याहून वेगळा काळ असू शकत नाही. भाजपमधील दिग्गज नेते देखील ही बाब ओळखून आहेत.

लोकसभेसाठी जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार या चारही मतदारसंघात भाजपविरुद्ध तगडा उमेदवार आजच्या घडीला नाही. विधानसभा निवडणुकांचा विचार करता मतांमधील विभाजन हे भाजपच्या पथ्यावर पडणारे आहे. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ विधानसभेची तयारी आत्तापासून भाजपानं सुरू केली आहे. छुप्या पद्धतीनं उमेदवारांची चाचपणी आणि मतदारसंघनिहाय आढावा घेण्याचं काम भाजपनं सुरू केलं आहे. जळगावात ठाकरे गट विरुद्ध पालकमंत्री, असा सामना अनेकदा रंगतोय.

धुळ्यात धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न दिसून येतो. भाजपनं कालिचरण महाराजांना धुळ्यात पाचारण केलं होतं. रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रमही झाला. भाजपचे अनुप अग्रवाल आमदारकीसाठी इच्छुक आहेत. शिवजयंजीच्या दिवशी मुस्लिम बहुल भागात दगडफेक झाली. याप्रकरणी आता समाजकंटक अतिक्रमणाच्या मुद्द्याचा आडोसा घेत आहेत.

त्यामुळे भाजपच्या ताब्यातील धुळे महापालिकेत अतिक्रमण मोहीम सध्या जोरात आहे. हा मुद्दा पुढे वाढून त्यातून मतांचं विभाजन करण्यासाठी राजकीय हत्यार म्हणून वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे धुळ्यात आमदार फारुख शहा यांनी सगळ्या वसाहतींमध्ये विकासकामांना सुरवात केली आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत मी असेलच, हा संदेश ते त्यांच्या कामातून देत आहेत.

धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन जळगावात एकनाथ खडसेंना घेरून धुळ्यात वातावरणनिर्मितीवर भर देत आहेत, तर नंदुरबारवर त्यांची नजर आहे. धुळ्यात काँग्रेसचे एकमेव आमदार कुणाल पाटील किल्ला लढवत आहेत. नंदुरबारमध्ये स्वरूपसिंग नाईक वाढत्या वयामुळे सक्रिय नाहीत. त्यांचे पुत्र आमदार शिरीषकुमार नाईक नवापूरचे नेतृत्त्व करत आहेत.

माणिकरावांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये पोकळी आहे. नंदुरबारची आमदारकी आणि खासदारकी विजय गावितांच्या घरात आहे. चंद्रकांत रघुवंशी प्रतिस्पर्धी असले तरी आदिवासी बहुल क्षेत्रामुळे त्यांच्या मर्यादा आहे. माजी मंत्री के. सी. पाडवी देतील तेवढीच भाजपसमोर लढत असेल. माजी आमदार पद्माकर वळवी सक्रिय होण्याचा मार्गावर आहेत.

गावित कुटुंब नंदुरबार आणि धुळ्यातील मोठ्या भागाचे सत्ताकेंद्र बनलं आहे. शिरपूरसह धुळ्यातील नंदुरबार लगतचा परिसर नंदुरबार लोकसभा क्षेत्रात येतो. विजयकुमार गावितांची कन्या डॉ. सुप्रिया गावित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. बंधू तथा माजी आमदार शरद गावित यांच्या दोन मुली आणि दुसरे बंधू प्रकाश गावित यांच्या पत्नी कुमोदिनी या देखील जि. प. सदस्य आहेत. धुळे-नंदुरबारमधील एकमेव मंत्रिपद आणि ते देखील आदिवासी मंत्रालय विजयकुमार गावित यांच्याकडे आहे. थोडक्यात, गावित कुटुंबामुळे नंदुरबारच्या सत्तेची चावी भाजपकडे आहे.

भाजप सध्या जरी शिंदे गटाला सोबत घेऊन जात असला तरी ताकद नसल्याने प्रत्यक्ष जागा वाटपावेळी भाजपचा वरचष्मा राहण्याची शक्यता दिसून येते. पुणे कसब्याचा निकाल मविआच्या बाजूने लागला तरी देखील खानदेशात आणि खासकरून पुढचं वर्षभर या एका विजयाचा प्रभाव राहण्याची शक्यता नाही. त्याचे सर्वांत प्रमुख कारण म्हणजे सत्ता आणि सत्तेच्या सगळ्या नाड्या भाजपकडे आहेत. त्यामुळे विरोधक आत्तापासून काय रणनीती आखतात, त्यावर मार्गक्रमण कसं करतात? यातच पुढील विजयाचे गमक दडलेलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT