Ahmednagar News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरच्या बालेकिल्ल्यातून निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना डावलून थेट दिल्लीत काँग्रेस नेत्यांना भेटतात, हे आश्चर्यकारक आहे.
राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये समन्वय नाही. प्रत्येकाल मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडू लागलीत. स्वयंघोषित मुख्यमंत्री राज्यात वाढले आहेत, असा टोला बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता मंत्री विखे यांनी लगावला.
मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी महायुतीच्या योजनेवर महाविकास आघाडीचे नेते न्यायालयात जातात, यावर देखील फटकारले. महायुती सरकारच्या योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीला न्यायालयाने सुद्धा चपराक दिली आहे. सरकारच्या योजनेला आणि राज्यातील भगिनींना न्याय दिला आहे. एकीकडे न्यायालया जायचे आणि दुसरीकडे योजनांचे अर्ज भरून घ्यायची ही धावपळ महाविकास आघाडीच्या नेत्यांची दिसते. हा दुटप्पीपणा लोकांपासून लपवून राहिलेला नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या खात्यात पैस जमा होतील, अशी माहिती राधाकृष्ण विखे यांनी दिली.
मंत्री विखे यांचे काँग्रेस (Congress) नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमध्ये दौरे वाढले आहेत. लोकसभा निवडणुकीपासून मंत्री विखे यांनी संगमनेरमध्ये दौरे वाढवले असून, विधानसभा निवडणुकीत नेमकी काय राजकीय रणनीती आखतात, याकडे लक्ष लागले आहे. मंत्री विखे यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
राहुरी किंवा संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असून, पक्षाने संधी द्यावी, असे सुजय विखे यांनी पूर्वीच म्हटले आहे. आता मंत्री विखे यांनी संगमनेर तालुका दत्तक घेणार असल्याची घोषणा केली आहे. महायुती सरकारकडून एकट्या संगमनेर तालुक्याला 473 कोटी रुपयांचा निधी योजना आणि विकास प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिला आहे. यापुढेही तालुक्यातील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, असे सांगून तालुका दत्तक घेणार असल्याचे मंत्री विखे यांनी म्हटले. मंत्री विखे यांची ही घोषणा आगामी राजकीय गणितांचे संकेत असल्याचे म्हटले जात आहे.
मंत्री विखे संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. तसंच भंडारदरा आणि निळवंड्यातून ओव्हर फ्लोचे पाणी कालव्यांना आजपासून सोडण्यात येणार आहे. निमगाव भोजापूर चारीच्या साफसफाईचे काम झाले, तर त्यातूनही लवकरच पाणी सोडले जाईल, असेही सांगितले. त्यानंतर महसूल पंधरवड्यानिमित्ताने तालुक्यातील 1 हजार 800 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचे प्रमाणपत्र मंत्री विखे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.