Vivek Kolhe Radhakrishan Vikhe Sujay Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirdi Sai Election : विवेक कोल्हेंच्या चतुर 'परिवर्तना'ने विखे पिता-पुत्रांची कोंडी!

सरकारनामा ब्युरो

- मोबीन खान

शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीमध्ये विखे यांचा 20 वर्षांपासून असलेला सत्तेचा दबदबा भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या राजकीय खेळीमुळे मोडीत निघाला. कामगार नेते विठ्ठल पवार हे परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व करत असले, तरी पटलावर विजयाच्या सोंगट्या विवेक कोल्हे फिरवत होते. यात विवेक कोल्हे ( Vivek Kolhe ) यांना यश आले आणि साईबाबा संस्थानच्या कर्मचारी सोसायटीत परिवर्तन झाले. 'चुकीच्या लोकांना राजाश्रय देत होते त्यांच्यासाठी हा धडा आहे. त्यांनी याच्यातून धडा घ्यावा, इथून पुढं दबावाचे आणि दहशतीचे राजकारणच या शिर्डी राहत्यात चालणार नाही, असा सूचक इशारा विवेक कोल्हे यांनी विखे पिता-पुत्रांचे नाव न घेता दिला.

साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीची निवडणूक रविवारी झाली. कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीत परिवर्तन पॅनेलने सर्वच 17 जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे ( Radhakrishan Vikhe ) आणि खासदार सुजय विखे यांच्या गटाने स्वतंत्र पॅनेल दिले होते. तिरंगी लढत झाली होती. विखे पिता-पुत्र गटाने स्वतंत्र पॅनेल देऊन कामगार नेते विठ्ठल पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावर भाजप युवा नेते विवेक कोल्हे यांनी राजकीय कुरघोडी कधी केली हे विजयानंतरच कळाले. विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनेलने विजय मिळवल्यानंतर विवेक कोल्हे हे समोर आले. यानंतर सोसायटीतील सत्तेच्या यशाचे 'परिवर्तन' अनेकांना उमगले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलने 20 वर्षांपासून विखे गटाच्या ताब्यात असलेल्या सोसायटीची सत्ता खेचून आणली. गणेश कारखान्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे विवेक कोल्हे यांनी एकत्र येत विखेंच्या ताब्यातून कारखाना खेचून आणला. त्यानंतर साई संस्थानच्या सोसायटी निवडणुकीत पुन्हा एकदा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांना मोठा धक्का बसला.

या विजयाचा आनंदोत्सव साजरा करताना विवेक कोल्हे म्हणाले, "विठ्ठल पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा दणदणीत विजय झाला. त्याबद्दल मी सर्व विजयी उमेदवारांचे कौतुक करतो. सोसायटीच्या सर्व सभासदांचे आभार मानतो, हा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा विजय आहे. हा दहशत आणि अन्यायाविरुद्ध उठवलेल्या आवाजाचा विजय आहे. हा दडपशाही करून 598 लोकांवर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात उठाव झाल्याचा विजय आहे. हा अनागोंदी कारभार चालू असलेल्या कार्यपद्धतीवरचा विजय आहे. हा कोणाचा तरी राजाश्रय घेऊन केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध विजय आहे. विठ्ठलराव पवार राजकीयदृष्ट्या अडचणीचा होतो, म्हणून कुठं तरी राजकारणाचा प्रभाव वापरून त्यांना झाडू खात्यात टाकून झाडू मारायला लावून अपमानित करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याविरोधात उठाव झाल्याचा हा विजय आहे."

"'शिर्डीत आता दबावाचं आणि दहशतीचं राजकारण चालणार नाही. हा सर्व सामान्यांचा विजय आहे. या ठिकाणी विठ्ठलराव पवार यांनी जो विडा उचलला त्याला सर्वांनी सहकार्य केले आहे. अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा जास्त जबाबदार असतो, म्हणून ज्यांच्यावर अन्याय होत होता, त्यांनी उठवलेला हा आवाज आहे. जे चुकीच्या लोकांना राजाश्रय देत होते, त्यांच्यासाठी हा धडा आहे. त्यांनी याच्यातून धडा घ्यावा, इथून पुढं दबावाचं आणि दहशतीचे राजकारणच या शिर्डी, राहात्यात चालणार नाही, याचा संदेश देणारी ही निवडणूक होती," असेही विवेक कोल्हे यांनी म्हटले.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT