Shirdi Nagar Parishad election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बऱ्याच उलथापालथी होताना दिसत आहे. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीत, 'RSS' अन् भाजपच्या जुन्या भिडूनं शड्डू ठोकला आहे. शिर्डी शहरातील स्थानिक ज्येष्ठ नेते बाबूजी पुरोहित यांनी स्वतंत्र पॅनल देण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी पत्रकबाजी आणि आता पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणाच केली.
बाबूजी पुरोहित यांच्या या भूमिकेनं शिर्डीत होमग्राऊंडवर मंत्री विखे पाटील यांची कोंडी झाली असून, त्यावर ते कशी मात करतात, याकडे लक्ष लागले आहे. बाबूजी पुरोहित यांच्या या भूमिकेमुळे शिर्डीत मंत्री विखे पाटील भाजपविरुद्ध भाजप, असा सामना रंगणार का? अशी देखील चर्चा आहे. शिर्डीतील या लढतीची दखल प्रदेश पातळीवर घेतली जाणार का, असा देखील प्रश्न आहे.
बाबूजी पुरोहित यांनी शिर्डी (Shirdi) नगरपरिषदेची निवडणूक लढवण्यासाठी गेल्या आठवड्यात शिर्डीतील नागरिकांना पत्रक वाटून, सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक मुद्द्यांवर विचार मांडले. आता पत्रकार परिषद घेत, निवडणुकीत स्वतंत्र मंडळ उभे करणार असल्याची घोषणा केली.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे छायाचित्र, त्यांच्या कवितेतील, 'आओ फिरसे दिया जलाए', या ओळी असलेल्या पोस्टरला साक्षी ठेऊन बाबूजी पुरोहित यांनी निवडणुकीत स्वतंत्र मंडळ उभे करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या घोषणामुळे पालिका निवडणुकीत (Municipal Election) तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय असलेले त्यांचे पुत्र विराट पुरोहित आणि सहकारी गणेश वाकचौरे उपस्थित होते. विराट पुरोहित हे संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहिले असून त्यांनी जिल्हा कार्यवाह म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
विराट पुरोहित म्हणाले, "शिर्डीची अर्थव्यवस्था ही साईमंदिर केंद्रीतच असायला हवी. मात्र शिर्डीत सध्या जे काही सुरू आहे, त्याबाबत सामान्य मतदारांच्या मनात असंतोष आहे. गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या. कुणी डिझेल चोरतो तर, कुणी लॉजवाल्यांकडून हप्ते गोळा करतो. अर्थव्यवस्था साईमंदिर केंद्रीत असायला हवी. क्रिकेट स्टेडियमला आमचा विरोध नाही. मात्र इथं प्राधान्य स्थानिक व्यवसायवृध्दीला द्यायला हवे. रस्त्यावर बसणारे पथारीवाले, फेरीवाले हे साईंच्या काळापासून असल्याची नोंद आहे."
'साईंच्या नित्य जत्रेची ती शोभा आहे. तुम्ही त्यांनाच पिटाळून लावता. छत्तीसगडमधून आलेले आणि संघाशी संबंधित फेरीवाले इथन निघून गेले, कारण त्यांच्याकडून पैसे उकळले जायचे. ही परिस्थिती बदलायला हवी, यासाठी आम्ही स्वतंत्र मंडळ उभे करण्याचा निर्णय घेतला. आमच्या कल्पनेस शिर्डीकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे,' असेही विरोट पुरोहित यांनी म्हटले.
बाबूजी पुरोहित उच्च शिक्षित असून, विद्यार्थिदशेत पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आले. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, गिरीश बापट यांच्याबरोबर भाजप ग्रामीण भागापर्यंत रुजवली. नोकरी सोडून शिर्डीत गावी येत, पूर्ण ताकदीने भाजपचे काम केले. भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ते झाले त्यानंतर ग्रामपंचायत जनसंघाच्या नावाने लढवायचा प्रारंभ केला व महाराष्ट्रातील दुसरी जनसंघाची ग्रामपंचायत यशस्वी केली. आणीबाणी मध्ये दीड वर्ष तुरुंगवास भोगला. शिर्डीत सामान्य माणसाच्या स्वावलंबनासाठी दुकानदारांचा संघर्ष काळात ते नेहमीच उभे असतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.