Ahilyanagar MIDC news : अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये गुंडांच्या दहशतीचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. भाजपचे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्याकडून या मुद्याला हवा दिली जाते.
दोघाही नेत्यांचा या मुद्यावर नेहमीच कलगीतुरा रंगतो. खासदार लंकेंचा बालेकिल्ला असलेल्या पारनेरमधील सुपा एमआयडीसीतील गुंडगिरीवरून मंत्री विखे पाटील चांगलेच आक्रमक झाले होते. नगर-पुणे रोडवरील सुपा परिसरातील अतिक्रमणांना यातून मंत्री विखे पाटलांनी बुलडोझर लावला होता. आता नगर शहर एमआयडीसीतील गुंडगिरी मोडून काढण्याचे सूचक संकेत मंत्री विखे पाटलांनी दिले आहे.
महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील कामगारांचा मेळावा झाला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले. नगर एमआयडीसीमधील गुंडगिरी मोडून काढण्याची भाषा करतानाच, सुपा एमआयडीसी पूर्णतः साफ केल्याचे सांगत, खासदार नीलेश लंके यांना नाव न घेता डिवचलं.
मंत्री विखे पाटील म्हणाले, "एमआयडीसीमध्ये खंडणीखोरांच्या टोळ्यांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झालेय. टपऱ्यांचे अतिक्रमण करुन गुंडांच्या टोळ्या पोसल्या जातात. हे अतिक्रमण हटविण्याचे आदेश एमआयडीसीला दिलेत". सुपा एमआयडीसी पूर्णतः साफ केलीय. नगर एमआयडीसीदेखील अतिक्रमणमुक्त सुरू. कामगार (Worker) व उद्योजकांना सुरक्षा देण्यासाठी कठोरपणे हा निर्णय घेऊ, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.
नगर एमआयडीसीचा विस्तार थांबला होता, महसूल मंत्री असताना हजारो कोटी रुपये किमतीची 600 एकर जमीन एमआयडीसीच्या विस्तारासाठी उपलब्ध करून दिली. तसेच मोठ्या उद्योग समूहांशी चर्चा सुरू असून, त्यांचा औद्योगिक प्रकल्प नगरमध्ये आल्यास औद्योगिक व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे, असेही मंत्री विखे यांनी म्हटले.
औद्योगिक क्षेत्राला सक्षम मनुष्यबळाची गरज आहे. कामगारांनी वेगवेगळे कौशल्य आत्मसात करावे. काळानुरूप पारंपरिक काम कालबाह्य होत असताना, वेगवेगळे कौशल्य आत्मसात करण्याची गरज निर्माण झाली आहे. हा बदल न स्वीकारल्यास कामगारांना स्पर्धेतून बाजूला पडावे लागेल, यासाठी प्रवाहाबरोबर बदल स्वीकारण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.