Ram Shinde Vs Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Shinde Vs Vikhe : राम शिंदेंचं विखेंना 'ओपन चॅलेंज'; म्हणाले," 2024 ला मीही खासदार असणार!"

Pradeep Pendhare

Ahmednagar News : भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये दणदणीत विजय मिळवला. मध्य प्रदेश आणि तेलंगणा येथील निवडणुकांमधील प्रचारात नगरमधील भाजप नेते माजी मंत्री आमदार राम शिंदे सहभागी होते. भाजपच्या विजयावर आमदार शिंदे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केलेल्या दाव्यानं नगरच्या भाजपच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडवून दिली आहे.

आमदार राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले, "भाजपचा विजयरथ लोकसभा 2024 मध्ये, असाच दौडत राहणार आहे. लोकसभा 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजप महायुती '45 प्लस' राहील. यात मी देखील खासदार असेल". सध्या क्रीजवर फलंदाज आहे की नाही, याबाबत अपील झाले आहे. फिल्डिंग करणाऱ्यांनी फलंदाजाविषयी अपील केले आहे. या अपिलावर पक्ष निर्णय घेईल. क्रिजवर बॅटिंग करण्यासाठी अनेक फलंदाज इच्छुक आहेत. यादी मोठी असल्याने पक्ष निर्णय घेईल असेही ते म्हणाले.

पण क्रिझवर असलेल्या फलंदाज अपिलामुळे घायाळ झाला आहे. घाबरून गेलाय. त्याला काहीच कळत नाही. ज्याबरोबर लढला, त्यालाच घेऊन पळतोय. हाच फलंदाजच बाॅलरला सांगतोय आऊट नाही म्हणून सांग. परंतु फलंदाजाने पॅट, ग्लोज सोडलेत. हेल्मेट काढले आहे. त्यामुळे फलंदाजाला देखील माहीत आहे की, आऊट झालो आहे म्हणून!"

आमदार राम शिंदे यांच्या या प्रतिक्रियेतून नगर दक्षिणमधील उमेदवारीवर मजबूत दावा सांगितला. दिवाळी फराळानंतर आमदार शिंदे यांनी नगर दक्षिण लोकसभेवर वारंवार दावा सांगत आहे. दिवाळी फराळाच्या निमित्ताने त्यांनी दक्षिणमध्ये संपर्क देखील वाढवला आहे. आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्याशी जवळीक वाढवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्येष्ठ नेते माजी आमदार अरुण जगताप यांची देखील त्यांनी भेट घेतली. महायुतीतील राष्ट्रवादीबरोबर इतर नेत्यांच्या गाठी भेटीवर देखील त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यातून आमदार शिंदे आणि आमदार लंके यांनी एकमेकांच्या दिवाळी फराळाला हजेरी लावून नगर दक्षिणमधील राजकीय वातावरण तापवले.

भाजपमधून अनेक इच्छुक, तर...

लोकसभेसाठी सर्व पक्षांची तयारी सुरू केली आहे. राज्य आणि देशपातळीवर उमेदवारांच्या सर्व पक्षांकडून चाचपणी सुरू आहेत. भाजपबरोबरच राष्ट्रवादीच्या शरद पवार गट, काॅंग्रेस, शिवसेना ठाकरे गट नगर दक्षिणसाठी चाचपणी करत आहेत. काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या नगर दक्षिणच्या अनुषंगाने बैठका देखील झाल्या आहेत. भाजपमध्ये (BJP) उमेदवारांमध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये उमेदवारांचा शोध सुरू असून, जागा नेमकी कोण लढवणार याबाबत एकमत अजून व्हायचे आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवाराचा शोध सुरू आहे आणि संपला देखील आहे, असे सांगितले जाते. शिवसेनेकडून राज्याच्या हिवाळी अधिवेशनानंतर नगर दक्षिणेबाबतच्या उमेदवाराबाबत चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT