MP Sujay Vikhe Patil - MP Amol Kolhe  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MP Sujay Vikhe Patil Vs Kolhe : '' जे लोक फडणवीसांचा शकुनीमामा उल्लेख करत आहेत, ते...''; खासदार विखेंचा कोल्हेंवर पलटवार

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी येवला येथील सभेत महाभारताचा दाखल देत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावेळी त्यांनी काही आक्रमण आलं तर कौरव पांडव भाऊ होते, ते एकत्र येऊन मुकाबला करत होते. मात्र, त्यात मिठाचा खडा कोणी टाकला तर तो शकुनीमामाने असं म्हटलं. तसेच आता हा शकुनीमामा कोण? असा सवाल करत मला काही कळेना झालंय. मिठाच्या खड्याचा आकार टरबुजासारखा झालाय की कमळासारखा झालाय? असा खोचक टोला लगावला होता. आता याच टीकेवर भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे.

भाजप खासदार सुजय विखे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार अमोल कोल्हेंवर निशाणा साधला. विखे म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी येवल्यात सभा घेतली. त्यावेळी बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांचे नाव न घेता त्यांना शकुनीमामा म्हटलं. पण, जे लोक फडणवीस यांचा शकुनीमामा असा उल्लेख करत आहेत ते मागच्या तीन वर्षापासून वेगवेगळ्या नाट्यप्रयोगात महाराष्ट्रात फिरत होते अशी बोचरी टीका केली.

विखे नेमकं काय म्हणाले..?

अमोल कोल्हे अतिशय उमदे अभिनेते आहेत. मनोरंजन म्हणून त्यांचे भाषण पाहावं, या पलीकडे त्यांच्या भाषणात काहीही नव्हतं. डायलॉग डिलिव्हरी अतिशय उत्तम करतात आणि लवकरच त्यांना कुठलातरी उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार देण्याचा प्रस्ताव आम्ही मांडणार आहोत असा उपरोधिक टोलाही विखे यांनी कोल्हेंना लगावला.

'' बैलगाडा शर्यतीत पण ते घोड्यावरच...''

अतिवृष्टीमध्ये किंवा राज्याला आवश्यकता होती, तेव्हा ते खासदार कधीही कुठे दिसते नव्हते. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगात ते घोड्यावर होते, बैलगाडा शर्यतीत पण ते घोड्यावरच होते. ते कधी जमिनीवर आलेच नाही, त्यामुळे त्यांना वास्तविकता माहित नाही अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

उद्धव ठाकरे आता तीन वर्षानंतर घराबाहेर...

खासदार सुजय विखे(Sujay Vikhe Patil) यांनी यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. विखे म्हणाले, आता तीन वर्षानंतर घराबाहेर पडले आहेत. त्यांनी महाराष्ट्रात काय चाललंय हे पाहायलाच पाहिजे. आपण काय दिलं त्यावर जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि काय अपेक्षा आहेत हे त्यांनी जाणून घ्यायला हवे. उद्धव ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यांना प्रतिसाद चांगला मिळत असला, प्रत्येक सभांना गर्दी होत आहे. पण, जनता मतदान करताना काम करणाऱ्या माणसांनाच मतदान करणार असंही खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

अमोल कोल्हे काय म्हणाले होते ?

शरद पवार यांची येवला जाहीर सभा घेतली. यावेळी पवारांच्या भाषणाआधी खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनी अजित पवार गट आणि भाजपवर हल्लाबोल केला. कोल्हे म्हणाले, सध्याची ही लढाई ही अधर्माची आहे. महाभारताचा विचार करतो, तेव्हा हाच तो शकुनीमामा आहे, ज्याच्यामुळं महाभारत घडलं. काही आक्रमण आलं तर कौरव पांडव भाऊ होते, ते एकत्र येऊन मुकाबला करत होते.

मात्र, त्यात मिठाचा खडा कोणी टाकला तर तो शकुनी मामा याने. आता हा शकुनी मामा कोण? असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.मला काही कळेना झालंय... मिठाच्या खड्याचा आकार टरबुज्यासारखा झालाय की कमळासारखा झालाय? असा सवाल करत अमोल कोल्हे यांनी मैदानात गाजवलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT