Jitendra Awhad
Jitendra Awhad Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Vs Awhad Politics: 'जितेंद्र आव्हाडांचे नाक कापणार' : धमकी देणाऱ्या अनिता भामरे कोण आहेत?

संपत देवगिरे

Nashik News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप यांच्यातील राजकीय वाद रोज नवे वळण घेत आहे. आता नाशिकच्या महिलानेत्याने थेट आव्हाडांचे नाक कापणार, असे वादग्रस्त विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या शहर उपाध्यक्षा आणि पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षा अनिता भामरे यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यांची ही घोषणा चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

माजी मंत्री आव्हाड यांनी शिर्डी येथे झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात प्रभू श्रीराम यांच्याविषयी वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. अयोध्येत उभारण्यात आलेल्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजपने गावोगावी कार्यक्रम सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना आव्हाड यांच्या वक्तव्याने एक नवीन मुद्दा मिळाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या संदर्भात भामरे म्हणाल्या, 'प्रभू श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारे आमदार आव्हाड यांनी नाशिक शहरात पाऊल ठेवल्यास मी स्वतःच त्यांचे नाक कापणार आहे. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहराचे व श्रीरामाचे अतूट नाते आहे. याच नाशिकमधील तपोवनात रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापले होते. अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मंदिरात 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असतांना अवघे वातावरण राममय झाले आहे.'

'देशभरात आनंदाचे वातावरण असताना बेताल वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरात तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम मांसाहारी होते, असे आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे समाजबांधव संतप्त आहेत. मी स्वतःदेखील खूप व्यथित आहे. आमदार आव्हाड यांनी नाशिक शहरात पाऊल ठेवल्यास मी स्वतःच आव्हाडांचे नाक कापेल,' असं विधान त्यांनी केलं.

भाजपच्या श्रीमती भामरे यांनी केलेल्या या घोषणेने या घटनेला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. भामरे यांनी राजकीय प्रसिद्धीसाठी हे विधान केले की, खरोखर त्या कायदा हातात घेऊन आंदोलन करतील, हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT