BJP Politics : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण काम पूर्ण होऊनही रखडलं होतं. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहाता स्वत:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावर मुंबई, ठाणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर व नागपूर या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या महापालिकांचा समावेश होत असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा येथील मतदानावर डोळा आहे.
समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण हे ११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर शिर्डी ते भरवीर या ८० किमीच्या टप्प्याचे लोकार्पण २६ मे २०२३ ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते. आता समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या व शेवटच्या इगतपुरी ते आमणे ७६ किलोमीटरच्या टप्प्याचे लोकार्पण ५ जून २०२५ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते झाले.
सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील आमणे येथे समृद्दीच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्याचे ठरले होते. मात्र फडणवीस यांनी हे उद्घाटन नाशिकच्या इगतपुरीला हलवण्याचा निर्णय घेतला. त्यामागे अर्थातच कथित श्रेयवादाचे कारण होते. यापूर्वी दोनवेळा उद्घाटनाचे मुहूर्त हुकले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजल्यानंतर भाजपने तातडीने शेवटचा टप्पा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याचे उद्घाटनही फडणवीस यांनी स्वत:च्या हस्ते ठेवले.
तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करतेवेळी समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मात्र, समृद्धी महामार्ग अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर होणार असला तरी त्याआधी भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विकासकामांचे भांडवल म्हणून समृद्धी महामार्गाचा मोठा फायदा होणार आहे. सर्वांधिक उत्पन्नाच्या सहा महापालिका डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला ड्रीमप्रोजेक्ट साकारला आहे.
समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे ७०१ किलोमीटरचे अंतर अवघ्या आठ तासात कापले जाणार आहे. दरम्यान मुंबईहुन नाशिकला जाण्यासाठी साधरण पावणेचार तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. मात्र समृद्धी महामार्गामुळे हा वेळ कमी होऊन अवघ्या अडीच ते तीन तासांत पोहचता येणार आहे. समृद्धी महामार्गावर ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या महापालिका देखील येतात. त्यामुळे भाजपसाठी समृद्धी महामार्ग निवडणुकीचा मुद्दा ठरणार आहे. त्याचा फायदा भाजपला करुन घ्यायचा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.