Crop insurance delay Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Crop insurance delay : विमा कंपन्यांची दिरंगाई, खतांचा काळाबाजार; पालकमंत्री विखेंचा थेट ‘एफआयआर’ आदेश

Kharif pre-season review meeting Ahilyanagar, Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil directed officialsregister criminal cases against fake seed suppliers, fertilizer black marketers, and crop insurance companies causing delays : भाजपचे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक घेत मार्गदर्शन केले.

Pradeep Pendhare

Ahilyanagar news : बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर केवळ परवाने निलंबित करण्याची औपचारिक कारवाई न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करा. खतांचा काळाबाजार, सक्तीची जोडविक्री व निर्धारित दरापेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

तसेच शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या पीक विमा कंपन्यांवरही गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा सूचना अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत पालकमंत्री विखे पाटील यांनी आढावा घेतला. आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार विक्रमसिंह पाचपुते, जिल्हाधिकारी (Collector) डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, "खरीप हंगामात खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे. जिल्ह्यात खतांचा पुरेसा राखीव साठा उपलब्ध ठेवण्यात आला असून, पारंपरिक युरिया व डीएपीला प्रभावी पर्याय म्हणून ‘नॅनो युरिया’ व ‘नॅनो डीएपी’च्या वापरास प्रोत्साहन द्यावे." खत खरेदी-विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी खतांच्या पिशव्यांवरील ‘क्यूआर’ प्रणाली व इलेक्ट्रॉनिक विक्री यंत्रणा प्रभावीपणे राबवावी. सर्व कृषी सेवा केंद्रांवर खतांचे दर व उपलब्ध साठा दर्शविणारे फलक लावणे बंधनकारक करण्यात यावे, असेही मंत्री विखे पाटील यांनी निर्देश दिले.

राज्याबाहेरून, विशेषतः सीमावर्ती भागांतून येणाऱ्या बोगस बियाण्यांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या मदतीने तपासणी नाके उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कापूस, सोयाबीन व रब्बी ज्वारीच्या बियाण्यांमध्ये झालेल्या फसवणुकीची गंभीर दखल घेत अनधिकृत विक्रेत्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मंत्री विखे पाटील यांनी दिले.

खरेदी केलेल्या खतांच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांकडून जादा भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत ‘राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स’ कंपनीकडून 100 किलोमीटरपर्यंत उपलब्ध असलेल्या मोफत वाहतूक सुविधेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालावे, असेही निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी, अहिल्यानगर जिल्ह्यात खते व बियाण्यांची कृत्रिम टंचाई तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी गुणवत्ता नियंत्रणावर विशेष भर देण्यात आला आहे. आतापर्यंत 11 हजार तपासण्या पूर्ण करून 103कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात दोन पोलिस केसेस व 19 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिली.

जागतिक परिस्थितीमुळे युरिया व डीएपी खतांचा संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन 5 हजार 400 मेट्रिक टन खताचा राखीव साठा निर्माण करण्यात आला असून, त्यापैकी 750 मेट्रिक टन साठा सध्या उपलब्ध आहे. अल-निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांबाबत विशेष जनजागृती करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सादरीकरण केले. या वेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माहितीपुस्तिकेचे व संतुलित खत वापर जागरूकता अभियान पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT