

Sharad Pawar NCP controversy : वारकरी संप्रदायातील घुसखोरीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरील शाई फेकचे समर्थन करत संग्रामबापू भंडारे यांनी नवीन वादाला तोंड फोडलं आहे.
'आपलाच हिंदू, हा हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी आडवा येतो, तेव्हा आम्हाला एका हिंदुला, दुसऱ्या हिंदुच्या डोक्यावर शाही टाकावीच लागते. ', असे म्हणत संग्रामबापू भंडारे यांनी म्हटलं.
शरद पवार राष्ट्रवादीचे (NCP) विकास लवांडे यांच्यावर गेल्या आठवड्यात आळंदी इथं संग्रामबापू भंडारे आणि त्यांच्या समर्थकांनी शाई फेक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. शरद पवार यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत, पोलिस महासंचालकांशी चर्चा केली. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील यावर चर्चा करणार असल्याचे संकेत आहे.
दरम्यान, संग्रामबापू भंडारे यांनी त्यांच्या कृतीचे समर्थन केलं आहे. राजगुरूनगर (पुणे) इथं आयोजित कार्यक्रमात त्यांनी विकास लंवाडे यांच्यावर केलेल्या शाई फेकचं समर्थन केलं. संग्रामबापू भंडारे यांच्या या समर्थन विधानाने नवीन राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
संग्रामबापू भंडार म्हणाले, "आपल्याला दगाफटका झाला तो आपल्याच लोकांमुळे झाला. आम्ही लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहादविरोधात लढा देत आहोत. पण आपल्याच हिंदू धर्माचे लोक आपल्या हिंदू धर्माच्या प्रचार-प्रसार करायला आडवे येतात. त्यावेळी नाइलाजास्तव एका हिंदुला, दुसऱ्या हिंदुच्या डोक्यावर शाई टाकावी लागते, तेव्हा आपला देखील दुःख होतं. आम्हाला आनंद झाला, असे नाही."
'आम्हाला औरंग्याला ठोकण्यात, अफजल्याला फाडण्यात मजा आहे. आम्हाला हिंदुची डोकी काळी करण्यात अजिबात आनंद नाही. खंडोजी खोपड्यांचे हातपाय तोडावेच लागले. सूर्याजी पिसाळाला शिक्षा द्यावीच लागली. हे फितूर, शेवटी धर्मासाठी घातक असतात. धर्माआड सख्खा बाप आला तरी सोडायचा नसतो. भाऊबंद जरी धर्माच्या वाटेत आले, त्यांना देखील सोडायचं नसतं,' असे विधानही संग्रामबापू भंडारे यांनी केले.
'वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचा संबंध नाही. वारकरी संप्रदायाचं भगवीकरण करण्याचं काम सुरू आहे. कुणी म्हणत असेल, जयश्रीराम हा राजकीय मंत्र आहे, असे कोणी म्हणत असेल, तर त्याचे जागेवर तोंड काळं करायचं काम करा. सोडू नका' असे वादग्रस्त आवाहन संग्रामबापू भंडारे यांनी केलं.
विकास लवांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संग्रामबापू भंडारे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 127(2), 189(2), 191(2) आणि 190 ही कलमे एकत्रितपणे बेकायदेशीर जमाव, जबरदस्तीने अडवणे, धमकी देणे आणि सार्वजनिक शांतता भंग करणे, अशापद्धतीचे गुन्हे नोंदवले आहेत. या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला अडवणे, दहशत निर्माण करणे किंवा हिंसक हेतूने जमाव करणे हा गुन्हे ठरतो. तसेच कलम 115(2), 351(2) आणि 352 ही कलमे मारहाण, दुखापत करणे, शस्त्रांचा वापर करून हल्ला करणे आणि गुन्हेगारी बळाचा वापर यांसंदर्भातील आहेत. एखाद्या व्यक्तीवर शारीरिक हल्ला करून जखमी करणे किंवा नुकसान पोहोचवणे हे या कलमांखाली दंडनीय गुन्हे मानले जातात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.