Nashik : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीच्या घटक पक्षांची आज पहिली बैठक झाली. या बैठकीत प्रमुख पक्षांनी निवडणुकीसाठी घरोघर जाऊन प्रचार करण्याचा संदेश आपल्या भाषणातून देत जोश निर्माण केला, मात्र आठवले गटाच्या नेत्यांनी मानापमान नाट्य सादर करीत महायुतीला थेट इशारा दिला.
महायुती म्हणजे फक्त भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट नव्हे. तर लहान पक्षांना हे लोक मानसन्मान केव्हा देणार? आमचा वापर केवळ कढीपत्ता म्हणून दिखाऊ आणि सुगंधासाठी केला जातो. हे थांबवा आम्ही मिठाचे काम सुद्धा करू शकतो. तुमच्या आळणी राजकारणाला चव देऊ शकतो.योग्य प्रमाणात वापर केला नाही, तर सर्व स्वयंपाक खारट करू शकतो. हे ध्यानी घेतले पाहिजे असा सूचक इशारा आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी महायुतीला दिला. लोंढे यांनी बैठकीबाबत 'सरकारनामा'ला माहिती दिली.
आज झालेल्या बैठकीत नाशिक मध्ये महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), बच्चू कडू यांचे प्रहार संघटना आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांची रिपब्लिकन पार्टी सहभागी झाली होती. अन्य लहान पक्षांचे प्रतिनिधी मात्र बैठकीला नव्हते.
आमचा समाज कधी धनुष्यबाण किंवा कमळाला मतदान करीत नसतो. फक्त रामदास आठवले यांना केंद्रात मंत्री केल्याने आमच्या मतांच्या आधारे नाशिक जिल्ह्यातील भाजपचे खासदार निवडून आले आहेत. विविध आमदारांच्या विजयात रिपब्लिकन जनतेचा महत्त्वाचा सहभाग आहे. मात्र कोणत्याही भूमिपूजन लोकार्पण अथवा अन्य कार्यक्रमात आमचा साधा नामोल्लेख देखील नसतो. रामदास आठवले यांचा फोटो देखील लावला जात नाही, ही आमची खंत आहे. प्रत्येक तालुक्यात आमचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी आहेत. त्यांना कोणीही बोलावत नाही हे आम्ही सहन करू शकत नाही हे मी आजच्या बैठकीत स्पष्टपणे सांगितले, अशी माहिती लोंढे यांनी दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आजच्या बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सुहास कांदे दिलीप बनकर, सरोज अहिरे, नितीन पवार, माजी आमदार बाळासाहेब सानप, प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ, लोकसभा मतदारसंघ प्रमुख केदा आहेर, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, शिंदे गटाचे अध्यक्ष अजय बोरस्ते, अजित पवार गटाचे अध्यक्ष रंजन ठाकरे, अजिंक्य घुगे, जोगेंद्र कवाडे गटाचे नेते गणेश उन्हवणे आदींसह घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.