Sujay Vikhe  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe : पारावरच्या गप्पा मारण्या इतकं सोपं आहे का? सुजय विखे का संतापले

Sujay Vikhe was angry about the politics of Shrirampur district : श्रीरामपूर जिल्हा करावा, अशी मागणी करत, त्यावर राजकारण करणाऱ्यांवर माजी खासदार सुजय विखे यांनी परखड मत मांडलं आहे.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी श्रीरामपूर जिल्हा करण्याच्या मागणीवर परखड मत मांडलं आहे. सुजय विखे यांनी जिल्हा विभाजनावर मांडलेल्या परखड मतावर आता श्रीरामपूरमधील राजकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे.

"महत्त्वांच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी श्रीरामपूर जिल्हा मागणी पुढे करून राजकारणाचा मुद्दा बनवला जात आहे. पारावर बसून, तिथं गप्पा मारून जिल्हा विभाजन होत नाही. भविष्यात कुठलाही जिल्हा झाला आणि कुणीही तो केला, तरी त्याला आपल्या शुभेच्छा असतील", असे परखड मत जिल्हा विभाजनावर माजी खासदार सुजय विखे यांनी मांडले.

भाजप (BJP) नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचा महायुतीतर्फे श्रीरामपूरमध्ये नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी खासदार सुजय विखे यांनी जिल्हा विभाजनाच्या मुद्यावर परखड मांडलं. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सुरवातील श्रीरामपूर जिल्हा म्हणून घोषणा करून टाकावी, असे म्हटले होते. तोच धागा पकडत सुजय विखे यांनी चांगलेच सुनावले.

"श्रीरामपूर तालुक्यात जनतेची कामे कुणालाच करायची नाहीत. फक्त जिल्हा करा, जिल्हा करा म्हणून आंदोलने करायची आहेत. इतर महत्वाच्या प्रश्न देखील आहेत. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी जिल्ह्याची मागणी पुढे करून राजकारणाचा मुद्दा बनवला जातो आहे. हे सर्वांना दिसते आहे. पण कोणी बोलत नाही. भविष्यात कुठलाही जिल्हा झाला आणि कुणीही तो केला, तरी त्याला आपल्या शुभेच्छा असतील", असे सुजय विखे यांनी म्हटले आहे.

सुजय विखे म्हणाले, "पारावर बसून श्रीरामपूर जिल्हा करायचा, श्रीरामपूर जिल्हा करायचा, अशा गप्पा मारल्या जातात. परंतु, जिल्हा केल्याने श्रीरामपूरचे सर्व प्रश्न सुटणार आहेत का, गोरगरीब लोकांना घर, जागा, पाणी आदी सुविधा कशा मिळतील हेही पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रश्नावर राजकारण बाजूला ठेवण्याचे आवाहन करून लोखंडे म्हणतात जिल्ह्याची घोषणा करू टाका". लोखंडे साहेब, आपण दोघेही आता माजी खासदार आहोत. आपल्या दोघांचीही अवस्था आता माजी सरपंचासारखी आहे, असे सुजय विखे यांनी म्हणताच, एकच हशा पिकला.

विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) हे कार्यक्रमाला उशिरा आले. मात्र, त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला. ते आल्यानंतर त्यांच्या हस्ते भूमिपूजने झाली. तसेच त्यांचा नागरी सत्कार व ग्रंथतुलाही करण्यात आली. यावेळी 178 कोटी 60 लाख रूपयांची शहर वाढीव पाणीपुरवठा योजना, सात कोटी 11 लाख रूपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते झाला. माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, विधानसभा समन्वयक नितीन दिनकर, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते.

नाव न घेता थोरातांवर टीका

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका करताना सुजय विखे म्हणाले, "साडेसात वर्षे महसूलमंत्रीपद उपभोगणाऱ्यांनी श्रीरामपुरातील खंडकरी शेतकऱ्यांना काहीही दिले नाही. याउलट जे 20 वर्षे होऊ शकले नाही ते आताचे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून दाखवत खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी विनामूल्य वर्ग 1 केल्या. या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे सुमारे 206 कोटी रुपये वाचणार आहेत". मी खासदार (कै.) बाळासाहेब विखे पाटील यांचा नातू म्हणून खंडकरी शेतकऱ्यांच्या या कार्यक्रमास उपस्थित आहे. त्यांचे या लढ्यात मोठे योगदान आहे. माजी आमदार भानुदास मुरकुटे, (कै.) जयंत ससाणे यांचेही यात योगदान आहे, असेही सुजय विखे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT