NCP workers protest against action on Nawab Mallik
NCP workers protest against action on Nawab Mallik 
उत्तर महाराष्ट्र

नवाब मलिक यांच्यावर केंद्र सरकारने सूड उगवला!

Sampat Devgire

धुळे : अल्पसंख्यांक कल्याण मंत्री नवाब मलिक (Nawab malliq) यांनी सातत्याने केंद्रीय (Centre) यंत्रणांची बेबंदशाही, निरंकुश कारभार व राजकीय इशाऱ्यानुसार होणारी कारवाई याविरोधात जनतेला सजग केले. त्यांचे गैरप्रकार जनतेपुढे मांडले. त्यामुळे त्यांच्यावर केंद्र सरकारच्या यंत्रणांनी सूड उगवला. मात्र जनतेला त्याची सर्व जाणीव असल्याने हे कारस्थान टिकणार नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी केला.

राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्यावर ‘ईडी’ने केलेल्या कारवाईचा शहरासह जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अल्पसंख्याक समाज संघटनेकडून निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक शाखेचे प्रदेशाध्यक्ष महम्मद खान यांच्या निर्देशानुसार येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध आंदोलनातून मंत्री मलिक यांच्यावरील कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला. भाजपप्रणीत केंद्र सरकार हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर सूड उगविण्यासाठी ईडीचा वापर करीत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. दबावतंत्राचा वापर करीत राज्यातील सत्ता घालविण्याचे केंद्राचे कटकारस्थान असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सलीम शेख, शहराध्यक्ष जमीर शेख, ग्रामीण कार्याध्यक्ष इरफान सय्यद, शहर कार्याध्यक्ष अजर पठाण, अल्पसंख्याक महिला अध्यक्षा शकिला बक्ष, अजहर सय्यद, बरकत शाह, एजाज शेख, रईस काझी, नगरसेवक अब्दुल्लतीफ अन्सारी, नगरसेवक वसीम बारी, जिया अन्सारी, अबुजर अन्सारी, अनस अन्सारी, सुदेश अन्सारी आदी सहभागी झाले.

शहर शाखेतर्फे निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजित भोसले यांनी मंत्री मलिक यांच्या अटकेचा निषेध केला. त्यांनी म्हटले आहे, की केंद्रातील भाजप सरकार सरकारी यंत्रणांचा गैरवापर करीत आहे. ईडीचा धाक दाखवून मंत्र्यांना व महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. हा प्रकार लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे चुकीचा पायंडा पडू शकतो. सुडाचे राजकारण केंद्र सरकार करीत आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रकरणी धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT