Nashik Lok Sabha Election: नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या जागेवरून भाजप-शिवसेना (BJP-Shivsena) आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, तर ही जागा मित्रपक्षाला मिळू नये, यासाठी पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत. या जागेसाठी शिवसेनेच्या आमदार खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे, तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेत ही जागा भाजपकडेच ठेवण्याचा आग्रह केला आहे. या दोन मित्रपक्षांमध्ये वाद सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटदेखील या शर्यतीत उतरतोय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ (Chhagan Bhujbal) महायुतीचे उमेदवार असणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर भुजबळ समर्थकांकडून एक टीझर व्हायरल करण्यात आल्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभेच्या निवडणुकासाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच आता नाशिक (Nashik) लोकसभा मतदारसंघातून अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते छगन भुजबळ निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भुजबळांच्या समर्थकांकडून एक टीझर सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम असतानाच भुजबळांचा टीझरमुळे नवीन चर्चांचा उधाण आलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, भुजबळांनी मागील काही दिवसांपासून मुंबईत तळ ठोकला आहे. ते वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटीदेखील घेत आहेत. शिवाय नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा असल्याचे छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.
लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. तरी अद्याप महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीतील मित्रपक्षांमध्ये नाशिक आणि ठाण्याच्या जागेमुळे वाद सुरू आहे. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी नाशिकच्या जागेवरून मलाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानासमोर शक्तिप्रदर्शनही केलं आहे, तर राष्ट्रवादीचे अनेक नेतेही नाशिकच्या जागेसाठी ठाम आहेत. अशातच आता भुजबळांच्या समर्थकांकडून व्हायरल केल्या जाणाऱ्या टीझरमुळे नाशिक मतदारसंघात नवा ट्विस्ट आला असून, शिवसेना-भाजपसह उमेदवारीच्या शर्यतीत अजित पवार गटदेखील सामील होणार की काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नाशिकची जागा कोणत्या पक्षाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.