Bhujbal Vs Kokate: मंत्रिमंडळात नियुक्ती झाल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे गुरुवारी नाशिकला आगमन झाले यावेळी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भुजबळ समर्थक यांनी जोरदार स्वागत केले. यानिमित्ताने पक्षामध्ये देखील उत्साह दिसला.
मंत्री छगन भुजबळ यांचे पक्षाच्या मुंबई नाका येथील कार्यालयात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांपासून तर सिंहस्थ कुंभमेळा, ओबीसी राजकारण अशा विविध विषयांना त्यांनी स्पर्श केला.
विशेष म्हणजे मंत्री भुजबळ यांच्या स्वागताला आमदार हिरामण खोसकर हे एकमेव आमदार उपस्थित होते. जिल्ह्यातील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यावेळी शासकीय कामकाजामुळे उपस्थित नव्हते. आमदार दिलीप बनकर, नितीन पवार आणि सरोज अहिरे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे तो देखील चर्चेचा विषय होता.
राज्याच्या मंत्री मंडळाच्या पहिल्या विस्तारात यंदा पहिल्यांदा श्री. भुजबळ यांना वगळण्यात आले होते. त्याचा आवर्जून उल्लेख करीत "देर आये, दुरुस्त आये" असे भुजबळ म्हणाले. यंदा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा समावेश करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कोकाटे आणि भुजबळ यांच्यात एकमेकांवर चांगलेच शरसंधान झाले होते.
हा धागा पकडून मंत्री भुजबळ म्हणाले, एखादे घर बांधायला घेतल्यावर विविध लोक विविध जबाबदाऱ्या पार पडतात. कोणी गवंडी होतो, कोणी सुतार होतो. तसेच मी देखील पक्ष बांधणीत योगदान दिलेले आहे. मधल्या काळात ज्या घडामोडी झाल्या त्यात मात्र काही दुःख वाट्याला आले.
मी पक्ष उभारणीसाठी मनापासून आणि प्रदीर्घकाळ काम केलेले आहे. विविध टप्प्यांवर माझे योगदान आहे. त्यामुळे मंत्रीपदाची संधी हुकल्यावर दुःख होणारच. मात्र जे सतत घरे बदलतात. आज एका घरात, उद्या दुसऱ्या घरात. सतत नव्या घरात घरोबा करतात. त्यांना आमचे दुःख कळणार नाही, असा उपरोधिक टोला विविध पक्ष बदललेल्या कृषिमंत्री कोकाटे यांचे नाव न घेता भुजबळ यांनी लगावला.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.