Suhas Kande & Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Suhash Kande Politics: सुहास कांदे यांचे थेट आव्हान, पंकज, समीर नको, छगन भुजबळांनीच माझ्याविरुद्ध लढावे"

Sampat Devgire

Bhujbal Vs Kande News: नांदगावचे आमदार सुहास कांदे राजकीय विधाने करण्यात तरबेज आहेत. बुधवारी त्यांनी थेट मंत्री छगन भुजबळ यांनाच आव्हान दिले. भुजबळ यांना दिलेल्या या आव्हानाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नांदगाव मतदारसंघाचे राजकारण सध्या महायुतीच्या दोन घटक पकक्षांतच रंगले आहे. त्यामुळे राजकारण देखील महायुतीच्या नेत्यांमध्येच फिरताना दिसते. एकनाथ शिंदे गटाचे आमदार कांदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे.

या पार्श्वभूमीवर बुधवारी मंत्री भुजबळ यांनी एक ट्विट करून खळबळ उडवून दिली होती. त्यावर शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी भुजबळ यांना सुनावले होते. त्यात आमदार कांदे यांनी आता नवी भर टाकली आहे.

आता आमदार कांदे यांनीच जर तर या पर्यायांचा उपयोग करीत मंत्री भुजबळ यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. या निमित्ताने आमदार कांदे यांनी भुजबळ कुटुंबीयांना डिवचण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे कांदे यांचे राजकीय विधान देखील भुजबळ यांच्याप्रमाणेच चर्चेचा विषय ठरले आहे.

आमदार कांदे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना सुनावले आहे. आता माजी आमदार पंकज भुजबळ अथवा माजी खासदार समीर भुजबळ नव्हे तर थेट मंत्री भुजबळ यांनीच माझ्या विरोधात उमेदवारी करावी. त्यांच्या विरोधात उमेदवारी करण्यास आपण केव्हाही तयार आहोत, असे खुले आव्हान दिले आहे.

आमदार कांदे म्हणाले, हवे तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिल्यास मंत्री भुजबळ यांच्या विरोधात येवल्यातून उमेदवारी करण्यास मी तयार आहे. मंत्री भुजबळ यांच्याशी चर्चा करण्यास आपण केव्हाही तयार आहोत. त्यांच्या पेक्षा ५०० कामे मी जास्तच केलेली आहेत.

आमदार कांदे यांच्या या विधानाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे करताना त्यांनी राजकीय चातुर्य देखील दाखविले आहे. आमदार कांदे यांचा हा बाण मंत्री भुजबळ यांच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे. आता त्यात भुजबळ आणि कांदे यांच्यातील राजकीय वाद कोणते वळण घेतो. हे लवकरच स्पष्ट होईल.

आमदार कांदे सातत्याने मंत्री भुजबळ थेट आव्हान देत असतात. आता त्यांनी भुजबळ यांच्या विरोधात विधान करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या परवानगीची अट मध्ये टाकली आहे. त्यातही उपमुख्यमंत्री फडणवीस हे भाजपचे नेते आहेत. त्यांची परवानगी घेण्याचा विषय कुठे येतो, असा प्रश्न निर्माण होतो.

नेत्यांची परवानगी घेऊन उमेदवारी करण्याची तयारी कांदे यांनी दाखवली. मग महायुतीचे घटक पक्ष म्हणून हे नेते एकाच राजकीय छता खाली वावरतात. थेट आणि जाहीरपणे विधाने करताना त्यांना नेत्यांची परवानगी आहे का?. तसे करताना ते पत्यांची परवानगी घेतात का? असाही विषय निर्माण होतो.

एकंदरच आमदार कांदे आणि मंत्री भुजबळ यांच्यातील आरोप प्रत्यारोप आणि राजकीय खडाखडी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुरू राहणार आहे. त्यात महायुतीत बंडखोरी अटळ दिसते आहे. त्यामुळे नांदगाव मतदारसंघ पुन्हा एकदा भुजबळ विरुद्ध कांदे या संघर्षामुळे चर्चेचा विषय बनला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT