Chhagan Bhujbal, Suhas Kande, Anil Kadam & Dr Rahul Aher Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik District Politics: कार्यकर्त्यांच्या नशीबी उपेक्षा कायम, नेते मात्र घर भरण्यासाठी सज्ज!

Family and Relatives in Multiple Parties: नाशिक जिल्ह्यात भाऊबंदकी आणि कुटुंबातील सदस्य एकाच वेळी अनेक पक्षात उमेदवार आणि इच्छुक.

Sampat Devgire

Nashik News: विधानसभा निवडणुकीसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर एकाच वेळी भाऊ आणि कुटुंबातील सदस्य उमेदवारीसाठी परस्पर विरोधी पक्षांच्या संपर्कात आहेत.

अनेक वर्ष नेत्यांच्या सतरंज्या उचलून आणि शब्द झेलून थकलेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी उमेदवारीसाठी यंदाही उपेक्षितच राहतील घराणेशाही आणि कुटुंबातील सदस्यांच्या उमेदवारीसाठी कुठे नेत्यांचे शब्द खर्ची होत आहेत. काही ठिकाणी नेते डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील निवडणूक अतिशय चुरशीची आणि चर्चेची ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ येवल्यातून पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना नुकतेच राज्यपाल नियुक्त आमदार करण्यात आले आहे. आता त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांचे कट्टर विरोधक आमदार सुहास कांदे यांना आव्हान देण्याची शक्यता आहे. ते अपक्ष उमेदवार असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडेही उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्या समर्थकांनी प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन नांदगावची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला घ्यावी असा आग्रह देखील केला आहे. एकंदरच या निमित्ताने मंत्री भुजबळ आणि माजी खासदार भुजबळ हे दोघेही दोन स्वतंत्र मतदारसंघातून उमेदवार असण्याची चिन्हे आहेत.

चांदवड-देवळा मतदार संघातून भाजपचे विद्यमान आमदार डॉ राहुल आहेर यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. मात्र या मतदार संघात पक्षाचे स्थानिक नेते आणि नाफेडचे संचालक व आमदारांचे चुलत बंधू केदा आहेर यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले होते. आमदार डॉ आहेर यांनी आपल्या ऐवजी केदार यांना उमेदवारी द्यावी, असे देखील पक्षाला कळवले होते. मात्र आमदार डॉ आहेर हेच उमेदवार आहेत. त्यामुळे केदा आहेर बंडखोरी करण्याची चिन्हे आहेत. ते अपक्ष उमेदवारी करू शकतात. त्यामुळे ही निवडणूक अतिशय रंजक होऊ शकते. यानिमित्ताने भाऊबंदीचे राजकारण पाहायला मिळेल.

अशीच स्थिती निफाड मतदार संघात देखील आहे. गेल्या निवडणुकीत विद्यमान आमदार अनिल कदम यांचा पराभव केवळ कुटुंबातील यतीन कदम यांच्या उमेदवारीमुळे झाला होता. यंदाही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून माजी आमदार कदम यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र भाजपमध्ये असलेले यतीन कदम यांनीही प्रचार सुरू ठेवला आहे. महायुतीचे ते घटक आहेत महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार दिलीप बनकर आहेत. तरीही भाऊबंदकीच्या राजकारणामुळे यतीन कदम हे माजी आमदार कदम यांना आव्हान देण्याची शक्यता आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून नांदगाव मतदार संघात आमदार सुहास कांदे उमेदवार आहेत. त्यांचा प्रचार जोरकसपणे सुरू आहे. मात्र त्यांचे बंधू गुरुदेव कांदे हे निफाड मतदार संघातून प्रहार पक्षाचे उमेदवार आहेत. त्यामुळे दोन सख्खे भाऊ एकाच वेळी दोन परस्परविरोधी पक्षांकडे आहेत. या दोन्ही पक्षांचे राजकीय विचार अतिशय टोकाचे आहेत. मात्र एकाच कुटुंबातील दोन उमेदवार या दोन्ही पक्षांकडून उमेदवारी करीत आहेत.

देवळाली मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार योगेश घोलप इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी पाठपुरावा केला. मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. या स्थितीत माजी आमदार घोलप यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्याशी संपर्क करून उमेदवारीसाठी पाठपुरावा केला होता. त्याला फारसे यश आले नाही. मात्र त्यांच्या भगिनी तनुजा घोलप-भोईर या भाजपकडे देवळाली मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. घोलप कुटुंबीयांत देखील एकाच वेळी दोन सदस्य वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.

नाशिक जिल्ह्यात राजकारणात प्रस्थापित असलेले विविध कुटुंब यंदा विधानसभेत उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यातील काहींना उमेदवारी निश्चित झाली आहे. याच कुटुंबातील काही सदस्य अन्य पक्षातून उमेदवारी मिळावी म्हणून देखील प्रयत्न करीत आहेत. यामध्ये प्रस्थापित राजकीय कुटुंबांना पक्षाकडून देखील संधी मिळत असल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT