Hundreds of Leaders Join NCP in Yeola Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : येवल्यात भुजबळांचे 'बळ' आणखी वाढले ; शिवसेना, भाजपसह शरद पवारांच्या पक्षातील शेकडो पदाधिकारी राष्ट्रवादीच्या ताफ्यात

Hundreds of Leaders Join NCP in Yeola : आपला बालेकिल्ला असलेल्या येवल्यात छगन भुजबळांनी पक्षसंघटन मजबुत करण्यासाठी समीर भुजबळांना मैदानात उतरवलेलं आहे. समीर भुजबळांच्या नेतृत्वात शिवसेना, भाजपसह शरद पवारांच्या पक्षातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Ganesh Sonawane

Yeola NCP : बालेकिल्ला असलेल्या येवला मतदारसंघात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे बळ आणखी वाढले आहे. पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यामुळे येवला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद आणखी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यातील पक्षसंघटन अधिक मजबुत करण्यासाठी पुतणे समीर भुजबळ यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकलेली आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवल्यात मुक्काम ठोकून विविध भागांत कार्यकर्त्यांच्या बैठका, संवाद आणि पक्षप्रवेशाचे कार्यक्रम घेत संघटन विस्तारावर भर दिला आहे.

या प्रवेश सोहळ्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक दयानंद जावळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे ज्ञानेश्वर खैरमोडे, भाजपचे कुणाल भावसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सागर नाईकवाडे यांच्यासह विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी बोलताना माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले, "येवल्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार व मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होत आहेत. हा वाढता जनाधार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांमध्ये निश्चितच पक्षाला मोठे यश मिळवून देईल. येवला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा अधिक जोमाने फडकेल, असा आम्हाला ठाम विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

या भव्य पक्षप्रवेशामुळे येवला तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्याने हालचाली सुरू झाल्याचे चित्र असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक आघाडीवर मोठी आघाडी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, संभाजी पवार,वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, दत्ता निकम, दीपक लोणारी, मोहन शेलार, देविदास निकम, राजेश भांडगे, निसार लिंबूवाले, ज्ञानेश्वर दराडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस शहर व तालुका कार्यकारिणीचे सर्व सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT